बुलढाणा येथे बस अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांच्या विषयी आमच्या मनात संवेदना आहेत. त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. मात्र समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झालेला आहे. तो शापित का झाला? याच्या खोलात जावं लागेल. हा महामार्ग बनवण्यासाठी सरकारने मनमानी केली. या महामार्गावर गेल्या एक वर्षांमध्ये सतत अपघात झाले आहेत. अखेर आपण कितीवेळा श्रद्धांजल्या वाहायचा. या मार्गावरील वेगमर्यादेसंदर्भात आम्ही अनेकदा मागणी केली, मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. हा रस्ता भ्रष्टाचारातून निर्माण झाला आहे. हा रस्ता बनवताना अनेकांच्या जमिनी जबरदस्तीने हडप करण्यात आल्या. अनेकांचे श्राप आणि अश्रू या रस्त्यामध्ये दिसत आहेत. म्हणून हे अपघात होत नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होतो. असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
“जनतेच्या प्रश्नांसाठी मुंबईतील आजचा मोर्चा निघणार आहे. भाजप ही एक नौटंकी आहे. विशेषतः मुंबईतील भाजप. त्यांना कोणतीही दिशा नाही. हिम्मत असेल तर निवडणूक घ्या. म्हणजे शोर कोण माजवतय आणि चोर कोण हे जनता दाखवेल. निवडणूक घयायच्या नाही लोकांना सामोरे जायचं नाही. आणि अशी नौटंकी करायची. आमचा आजचा मोर्चा पाहून आमच्या राजकीय विरोधकांच्या डोळ्यातील बुब्बुळं बाहेर येतील.” असे मत राऊत यांनी व्यक्त केले.
“निवडणूका तेच घेऊ शकतात ज्यांना विजयाची खात्री आहे. आम्ही आव्हान देतो कारण जनता आमच्या पाठीशी आहे. सर्व महापालिकांवर प्रशासक नेमून जनतेच्या पैशाची जी लूट सुरु आहे, त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी आजचा मोर्चा आहे. आदित्य ठाकरे यांनी रस्ते घोटाळा, फर्निचर घोटाळा अशा अनेक विषयांबद्दल आवाज उठवला आहे. ज्यांची भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला हवी होती असे सर्व लोक भाजप आणि शिंदे गटाने त्यांच्या पक्षात घेतले.” असा आरोप यावेळी राऊत यांनी केला.











