भोपाळ : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लाडकी बहीण योजनेवर केलेली टीका भोवणार असल्याची चिन्ह आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेवर टीका करताना संजय राऊत यांनी मध्य प्रदेशमधील योजना बंद झाली असल्याचे वक्तव्य केले होते.
मध्य प्रदेशातील ‘लाडकी बहीण’ योजना ही महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना सुरू केली. राज्यात जवळपास दोन कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. राज्यात या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात.
भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुभाषा चौहान यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी समाजात खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने, स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
चार दिवसांपूर्वी म्हणजे 7 ऑक्टोबरला सकाळच्या पत्रकार परिषद मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजना बंद पडली आहे, महाराष्ट्रातील योजना बंद पडेल असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. मध्य प्रदेशमध्ये गेल्या दोन वर्षांपासून लाडकी बहीण योजना सुरू आहे.