यावेळी भाजपच्या भराडीदेवीच्या यात्रेतील शक्तिप्रदर्शनावर निशाणा साधत ते म्हणाले की, पैशाची ताकद दाखवून शक्तिप्रदर्शन केल्याने कधी देवी पावते का? कोकणातील भराडीदेवीने आयुष्यभर शिवसेनेलाच आशीर्वाद दिले आहेत. शिवसेनेचा जन्म हा कोकणातून झालेला आहे. त्यांना भराडीदेवीचा आशीर्वाद असता तर तो विधान परिषद निवडणुकीत दिसला असता. पण ती देवी सगळ्यांचं कल्याण करते. भराडीदेवीचं महत्व आणि मांगल्य काय आहे, हे आम्हाला माहित आहे. पक्षाचे खेळ करून देवस्थानं आणि श्रद्धास्थानं ताब्यात घेता येत नाहीत.
बंडखोरांच्या बाबतीत उद्धव ठाकरे गाफील राहिले या अजित पवारांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे गाफील राहिले नाहीत, तर त्यांनी आपल्या विश्वासू लोकांवर जास्त विश्वास ठेवला. विश्वासघात हा विश्वासातल्या माणसाकडूनच होत असतो. हे अजित पवारांना माहित आहे. पण आम्ही देखील या सर्व हालचालींविषयी उद्धव ठाकरेंना सांगतच होतो. या हालचालींचा सुगावा सगळ्यांनाच लागला होता. तरीही उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की ही आपली लोकं आहेत, स्वतःला कडवट व निष्ठावान शिवसैनिक म्हणवणाऱ्यांवर अशाप्रकारे अविश्वास दाखवून चालणार नाही.
यावेळी नारायण राणेंचा समाचार घेताना ते म्हणाले की, नारायण राणे वारंवार जी विधानं करत आहेत त्या विधानांना काहीच अर्थ व त्यात काहीच तथ्य नाही. त्यामुळे आता त्यांना कोर्टामध्ये यावं लागेल आणि तेथे उत्तर द्यावं लागेल. राणेंची दोन मुलं वापरत असलेली भाषा ही त्यांची संस्कृती असून या संस्कृतीला विकृती म्हणतात. यासाठीच आम्ही न्यायालयात गेलो आहोत आणि आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. भाजपचे लोक त्यांना लिहून दिलेलं स्क्रिप्ट आमच्याविरोधात वाचतात. मात्र त्यांनी बोलत राहावं आम्हाला त्याचा फायदाच होईल.
यावेळी केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईबाबत ते म्हणाले की, फक्त विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्राचं हे क्रूर राजकारण सुरु आहे. इतका मोठा हिंडेनबर्ग घोटाळा झाला आहे. मात्र तिथे ईडी आणि सीबीआय तिथे जात नाही. तिथे 30 तास नाही तर 30 मिनिटे चौकशी करून दाखवा. असे आव्हान राऊतांनी केंद्रीय तपास यंत्रणांना दिले.
ज्याप्रमाणे विधानसभेच्या 5 निवडणूका झाल्या, त्यावेळेस तेथे नागपूर येथेही आम्ही आमचा उमेदवार दिला होता. महाविकास आघाडी म्हणून आपल्याला जिंकायचं आहे. हे ठरल्यावर शिवसेनेने वारंवार त्यागाची भूमिका ठेवली. आपल्यामुळे महाविकास आघाडीचं नुकसान होऊ नये ही आमची भूमिका आहे. आम्हा सर्वांचा राजकीय शत्रू एकच असून त्यांचा पराभव व्हायला हवा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही ते करून दाखवलं. 5 पैकी 4 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या तर एक जागा भाजपने जिंकली. अमरावती आणि नागपूर या दोन महत्वाच्या जागा महाविकास आघाडीने जिंकल्या त्या एकीमुळेच. आता कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढेल. चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी अशी आमची भूमिका व आग्रह आहे. तरी यासंदर्भात आम्ही महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेऊ. या दोन्ही ठिकाणी जिंकण्याची संधी कोणाला जास्त आहे. हे ठरवले जाईल आणि त्यानुसारच निर्णय घेतला जाईल. यामध्ये कोणतेही मतभेत किंवा रस्सीखेच नाही. महाविकास आघाडीचा विजय हे आमचे एकमेव ध्येय आहे. असे राऊत म्हणाले.
ज्यावेळी आम्ही अंधेरीची पोटनिवडणूक जिंकलो तेव्हाही सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला. विधानपरिषद निवडणुकीतही आम्ही एकमेकांना मदत केली. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड आणि कसबा येथेही आम्ही त्याच स्पिरिटने लढू. असे राऊत म्हणाले.