सराईत गुन्हेगार बंडाने मुंबईच्या गँग सोबत वाजवला गेम, एलसीबीने साधला गुन्हेगारांवर नेम!

0
15

धरणगाव – : तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ पैसे घेऊन जात असलेल्या तिघांच्या कारला धडक देत १ कोटी ७ लाखांची रोकड लुटल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. जळगाव एलसीबीच्या पथकाने गुन्ह्याचा पडदा फाश केला असून कट रचणाऱ्या दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्ह्यात कट रचणारा मुख्य संशयित अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी हा दरोड्याच्या गुन्ह्यात कारागृहात असताना त्याची पर जिल्ह्यातील काही आरोपींशी ओळख झाली आणि बाहेर येताच त्याने कट रचला. महिनाभर रेकी केल्यावर मुंबईच्या गँगला परफेक्ट टीप देऊन त्याने गेम वाजवला. जळगाव एलसीबीच्या पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून ४८ लाख रुपये हस्तगत केले आहे. गुन्ह्यातील ४ संशयीत अद्याप फरार असून पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील उपस्थित होते. धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इम्पेक्स जिनींगमधून शेतकऱ्यांना देण्यासाठी १ कोटी ६० लाख रुपये घेवून तीन कर्मचारी कारने जळगावहून धरणगाव जात होते. दुपारच्या सुमारास मुसळी फाट्याजवळ त्यांच्या कारला समोरुन येणाऱ्या कारने धडक दिली. अपघातानंतर लागलीच चौघांनी चालकाच्या डोळ्यात मिरची पुड टाकली आणि लोखंडी रॉडने मारहाण करीत त्यांच्याकडील १ कोटी ६० लाखांची रोकड घेवून चोरटे तेथून पळ काढला. भरदिवसा जिनिंगची रोकड लुटल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

गुन्ह्यात वापरलेली दोन्ही वाहने ही चोरीची असल्याने पोलिसांसमोर गुन्हा उघडीस आणण्याचे आव्हानच होते. जिल्ह्यातील पोलीस प्रशासनासाठी स्टेट बँकेत झालेल्या लूट नंतर हा मोठा चालू वर्षातील सर्वात मोठा गुन्हा असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्र्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. घटनास्थळी भेट देऊन त्यांनी घटनेची माहिती घेतली होती. रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि इतर माहिती घेऊन लवकरात लवकर गुन्हा उघड करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या होत्या.

तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, कर्मचारी विजयसिंग पाटील, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश महाजन, अकरम शेख, राहूल पाटील, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, रफिक शेख, लक्ष्मण पाटील, सुधाकर अंभोरे, जयंत चौधरी, संदिप सावळे, किरण चौधरी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, अनिल जाधव, हेमंत पाटील, राहुल बैसाणे, दर्शन ढाकणे, महेश सोमवंशी, अभिलाषा मनोरे, रजनी माळी, वैशाली सोनवणे, रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेंढे, कमलाकर बागुल, संदिप पाटील, गोरख बागुल, प्रविण मांडोळे, अनिल देशमुख यांचे पथक वेगवेगळ्या दिशेने रवाना केले होते.

 

गुप्त माहिती आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अनिल उर्फ बंडा कोळी रा.विदगाव याचे नाव समोर आले होते. अनिल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील ५ गुन्हे दाखल असल्याने पथकाने त्याचा शोध घेत मुसक्या आवळल्या. चौकशी केली असता अनिल उर्फ बंडा कोळी याने आपल्या साथीदारांसोबत महिनाभर जिनिंगमधील कर्मचारी व मालकांच्या हालचालीची रेकी केली. यामध्ये ते कुठल्या दिवशी बँकेत येतात, कधी आणि किती कॅश कोणत्या रस्त्याने घेवून जातात, ही संपुर्ण माहिती गोळा केल्यानंतर अनिल याने दरोड्याचा प्लॅन रचला होता. एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात असतांना त्याची ओळख घरफोडीमधील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारासोबत झाली होती. त्याला भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांशी बंडा याची ओळख झाली होती. बंडा हा जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने उल्हासनगर येथील दरोडा टोळीशी संपर्क प्लॅन अंमलात आणला.

पोलिसांनी अनिल उर्फ बंडा कोळी रा.विदगाव , दर्शन भगवान सोनवणे यांना अटक केली आहे. दोघांकडून पोलिसांनी गुन्ह्यातील ४८ लाखांची रोकड आणि २ तलवार, १ गुप्ती, २ चाकू हस्तगत केले असून चौघे अद्याप फरार आहेत. दोघांना सोमवारी धरणगाव येथे न्या.सूर्यवंशी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पुढील तपासाकामी दि.२२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Spread the love