केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजेजू यांनी आज लोकसभेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले. यानंतर सभागृहात विधेयकावरील चर्चेला सुरुवात झाली असून, विरोधी पक्ष आणि सरकारी नेत्यांमध्ये जोरदार वादविवाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
याचबरोबर या विधेयकाला विरोध करणाऱ्यांनी सभागृहा बाहेर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. अशात जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र मेहबूबा मुफ्ती यांनीही या विधेयकावरून सत्ताधारी भाजपावर टीका केली आहे. “ते सत्तेतून जातील तोपर्यंत संपूर्ण देश उद्ध्वस्त झालेला असेल”, असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.
भाजपाने मुस्लिमांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईचा…
लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आल्यानंतर जम्मू आणि काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री आणि पिपल्स डेमोक्रॉटीक (JSNN)पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, “वक्फ दुरूस्ती विधेयक गेल्या १० वर्षांपासून भाजपाने मुस्लिमांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईचा हा एक भाग आहे. आता ते वक्फ दुरुस्ती विधेयक आणून आमच्या मालमत्ता ताब्यात घेऊ इच्छितात. आपला देश जगभरात बंधुत्वासाठी, गंगा-जमुना आणि तहजीबसाठी ओळखला जात होता.”
देश उद्ध्वस्त झालेला असेल
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, “ते (भाजपा) विसरले आहेत की, आज त्यांचे सरकार आहे पण उद्या त्यांचे सरकार राहणार नाही. ते जाईपर्यंत संपूर्ण देश उद्ध्वस्त झालेला असेल. सध्या सत्तेत असलेले भाजपा सरकार मुस्लिमांच्या हक्कांचे उल्लंघन करत आहे. येत्या काळात संपूर्ण देशाला याचे परिणाम भोगावे लागतील.”