मुंबई -: अनेक दशके उद्योग क्षेत्रात कार्यरत असतानाही समाजसेवेची भावना ओतप्रेत अंगी भिनलेले ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु बुधवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने उद्योग जगतावर शोककळा पसरली आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने टाटांनी देशातच नव्हे तर जगभरात छाप सोडली.
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1936 रोजी मुंबईत झाला. टाटा 10 वर्षांचे असताना, 1948 मध्ये त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजीने केले. आजी नवजबाई टाटा यांनीच टाटांना दत्तक घेतले. त्यांचे सुरूवातीचे शिक्षण मुंबईत झाले. पुढे बिशप कॉटन स्कूल, शिमला, नंतर कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस कॉलेजमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. रतन टाटा यांनी अमेरिकेतील दहा वर्षांच्या वास्तव्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये भांडी घासण्यापासून ते लिपिकपदाच्या नोकरीपर्यंत सर्व केले.
रतन टाटा यांची कामाविषयीची प्रामाणिकता आणि धडपड पाहून जेआरडी यांनी रतन टाटांना टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. रतन टाटा यांनी १९६१ मध्ये टाटा स्टीलमधून आपल्या उद्योग जगतातील कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. प्रचंड मेहनताच्या जोरावर टाटांनी समूहाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम काम केले. ज्या सालात टाटांनी समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली तो काळ भारताच्या दृष्टीने अत्यंत खडतर होता. पंतप्रधान व्ही पी सिंह आणि अर्थमंत्री मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात भारताने खासगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. 1990 ते 2012 या काळात त्यांनी समूहाचे अध्यक्षपद भूषवले तसेच ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते.आज घडीला टाटा ग्रुपच्या ८० देशांत १०० कंपन्या आहेत आणि त्यामध्ये सव्वाचार लाख कर्मचारी आहेत.
परोपकार अन् दानधर्मासाठी रतन टाटा यांची विशेष ओळख होती. आपल्या कमाईतला ठराविक वाटा ते दरवर्षी धर्मादाय कार्यात खर्च करत असत. चार वर्षांपूर्वी देशावर कोव्हिडचे संकट आलेले असताना रतन टाटा यांनी पीएम केअर फंडाला १०० कोटी रुपये दिली होती.