जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण व वेतन अधिक्षक ईजाज तडवी यांच्या चौकशीचे आदेश 

0
24

जळगाव – : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मोठी खळबळ उडवणारा प्रकार समोर आला असून, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी सौ. कल्पना चव्हाण आणि वेतन अधिक्षक श्री. ईजाज तडवी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

गणवेश वितरण प्रकरणात यापूर्वी निलंबित झालेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवून पुन्हा त्याच पदावर कार्यभार स्वीकारल्याचा आरोप करण्यात येत आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या काळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देणे, JSNपगार रोखणे तसेच आर्थिक पिळवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत.

पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील (वि.स.स.) यांनी १० डिसेंबर २०२५ रोजी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर केला आहे. या अर्जात असा आरोप करण्यात आला आहे की, शिक्षणाधिकारी सौ. कल्पना चव्हाण या शिक्षण संस्थांवर खोट्या चौकशी लावून शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवतात आणि मानसिक तसेच आर्थिक छळ करतात.

तक्रारीनुसार, या कथित गैरप्रकारांसाठी काही दलाल कार्यरत असून, त्यामध्ये जळगावचे स्वप्निल पाटील, पाचोर्‍याचे पंकज पाटील, सतिश पाटील तसेच सौ. चव्हाण यांचे पती धाडी साहेब (विस्तार अधिकारी, भुसावळ) यांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. या माध्यमातून लाखो रुपयांची अवैध वसुली केल्याचा आरोपही तक्रारीत नमूद आहे.

या तक्रारीची गंभीर दखल घेत शालेय शिक्षण विभागाने ११ डिसेंबर २०२५ रोजी आयुक्त (शिक्षण) यांना पत्र पाठवले आहे. कक्ष अधिकारी निशा महाजन यांच्या स्वाक्षरीने निर्गमित या पत्रात, शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार तातडीने चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करणे अथवा त्यांचे अधिकार काढून पदावनत करण्याची मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे.

आमदार किशोर पाटील यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे की, “गणवेश घोटाळ्यात निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा कार्यभार देणे धक्कादायक आहे. वारंवार तक्रारी होऊनही कारवाई होत नसल्याने शासनाने तात्काळ हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.”

दरम्यान, जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात यापूर्वीही शालार्थ आयडी घोटाळा व इतर आर्थिक अनियमिततेचे प्रकार समोर आले होते. मात्र, सध्याचे आरोप अधिक गंभीर स्वरूपाचे असून, शिक्षक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकरणाबाबत शिक्षणाधिकारी सौ. कल्पना चव्हाण यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, “या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही,” असे त्यांनी सांगितले आहे. शासनाकडून सुरू झालेल्या चौकशीमुळे या प्रकरणाचा पुढील प्रवास काय दिशा घेतो, याकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Spread the love