मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन विनाकारण वाद सुरू आहे. मात्र, आता हा वाद थांबला पाहिजे, आजच्या परिस्थितीत या सगळ्या गोष्टी बाजूला सारून बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण यावर विचार करायला हवा, असे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून, समर्थकांकडून अनेकदा जाणता राजा ही पदवी देण्यात येते. याबद्दलही भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले.
शरद पवार यांना देण्यात येणारी जाणता राजा ही पदवी योग्य असल्याचे आपल्याला वाटते. मी त्यांच्यासोबत फिरलो आहे. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष दिले, महिलांचे प्रश्न असतील, विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा विषय असेल. जो जनतेचे प्रश्न सोडवतो, त्याला जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे, असा सवालही भुजबळ यांनी केला. शरद पवार यांना आम्ही जाणता राजा म्हणतो, तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा, असे छगन भुजबळ म्हणाले.
अजित पवार यांच्या विधानावरुन होत असलेला वाद आता थांबायला हवा. अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलेला नाही. याउलट भाजपच्या अनेक नेत्यांनी महापुरुषांना कमी लेखण्याचे काम केले. अजित पवारांनी तसे केले नाही. संभाजीराजेंनी स्वराज्याचे रक्षण केले. म्हणून त्यांना स्वराज्यरक्षक म्हटले. पण कुणाला धर्मवीर म्हणायचं असेल, तर म्हणू शकता. भाजपच्या नेत्यांची वक्तव्यांवर पांघरूण घालण्यासाठी हा वाद सुरू आहे. मात्र, आता हा वाद थांबायला हवा, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांचे विधान चुकीचे असते, तर विधानसभेत त्याचवेळी त्यांना सांगायला हवं होतं की, हे रेकॉर्डवर चुकीचे जात आहे. यापूर्वी एका वर्गाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. मग शिवाजी महाराज आमचे प्रतिपालक नाही का, ते फक्त त्यांचेच प्रतिपालक आहे का, आजच्या परिस्थितीत या सगळ्या गोष्टी बाजूला सारून बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण यावर विचार करायला हवा, असेही भुजबळ यांनी म्हटले. तर, संभाजी महाराजांना कुणी धर्मवीर म्हणा, कुणी स्वराज्यरक्षक म्हणा, असेही ते म्हणाले.