चोपडा(प्रतिनिधी)तालुक्यातील शेतशिवारातील शेकडों पाणंद रस्ते वर्षानुवर्षांपासून जसेच्या तसेच असल्याने ह्या रस्त्यांवरून शेतीसाहित्य व मालाची ने-आण करतांना शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत.याकरिता तालुक्यातील शेत,शिवार,पाणंद रस्तेदुरूस्तीसाठी शासनस्तरावरून मोठ्या प्रमाणावर भरीव निधी मिळावा,अशी आग्रही मागणी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक)यांनी ह्या पत्रकान्वये केलेली आहे.
ह्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना “पालकमंत्री शेत/शिवार/पाणंद रस्तेदुरुस्ती योजना” मंजूर केलेली होती.आताच्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकासआघाडीच्या सरकारने या योजनेचे नाव बदलवुन “मातोश्री शेत/शिवार/पाणंद रस्तेदुरुस्ती योजना”असे केलेले आहे. परंतु अजूनही या योजनेच्या माध्यमातून शेतीत जाणाऱ्या खराब रस्त्यांची दुरुस्ती होताना दिसत नाही. सोबतच्या छायाचित्रात दर्शविल्याप्रमाणे शेतकऱ्यांना शेतात जायला व यायला मुक्या जनावरांसह मरण यातना सहन कराव्या लागत आहेत.म्हणूनच की काय ? सर्वत्र ही योजना शेतशिवार ऐवजी फक्त कागदावरच काम करताना दिसत आहे.याबाबत सामा.कार्यकर्ते श्री.बाविस्कर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेशी धानोरे खुर्द येथील एका कार्यक्रमप्रसंगी सविस्तर चर्चाही केलेली होती.ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आपापल्या गावालगतचे शेत,शिवार,पाणंद रस्तेदुरुस्तीसाठीचे ठराव ग्रामसभेत मंजूर करून असे प्रस्ताव जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी,तहसिलदार यांचेकडेस पाठवावेत,असेही आवाहन गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी केलेले आहे.