मुंबई -पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाहीय. जे लोक शिवसेनेतून फुटून गेले त्यांनी काही ना काही उद्देश व लाभ ठरवून केले आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे. काही आमदार पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात चित्र वेगळे असेल, असे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. मराठवाडय़ातील शेतकऱयांची झालेली हानी आणि पुणे शहराची पावसामुळे झालेली प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारने जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होते, मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची जोरदार टीका जयंत पाटील यांनी केली. पुण्यात प्रलय आल्याने शहराची वाताहात झाली. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झाला तर दुसरीकडे मराठवाडय़ातील शेतकऱयांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. मात्र मुख्यमंत्री इतर गोष्टीत अडकलेले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे दबावाला बळी पडणार नाहीत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नामोहरम करणे आणि त्यांना अडचणीत आणणे असा उद्योग काही लोक करत आहेत, मात्र त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उद्धव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत, असेही जयंत पाटील म्हणाले.
दिवाळी गोड करणार सांगून पैशाची तजवीज नाही
सरकारने शिधावाटपाची घोषणा उत्साहात केली. सरकार आपली प्रतिमा सुधारण्याच्या गडबडीत आहे. त्यातून घोषणा केली. मात्र पैशांची जुळणी झालेली नाही, असा आरोप करतानाच जुळणी झाली तर किमान दिवाळीच्या अगोदर घोषणा केल्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली. मात्र सरकारने दिवाळी गोड करणार अशी घोषणा करून पैशांची तजवीज केली नाही यातून सरकारची अकार्यक्षमता लक्षात येते, असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.