शिंदे गटाच्या आमदाराची पत्रकाराला शिवीगाळ; हात-पाय तोडण्याची भाषा अन् वर म्हणतो.. ही बाळासाहेबांची स्टाईल!

0
51

जळगाव – :जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट जाब विचारणाऱ्या यूट्यूब पत्रकार संदीप महाजन यांना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ केल्याची कथित ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे.

सदर ऑडिओ क्लिपमद्ये आमदार किशोर पाटील यूट्यूब पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ करत असल्याची बाब ऐकावयास मिळत आहे. एवढेच नाही तर ते त्याला हात – पाय तोडण्याची धमकीही देताना ऐकून ऐकू येत आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, गोंडगाव येथील 8 वर्षीय मुलगी 30 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. गावातील स्वप्नील पाटील नामक तरुणाने बलात्कार करून तिची हत्या केल्याचे 1 ऑगस्टला उघड झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने 48 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत पोलिसांवर दडकफेक केली. तसेच 4 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर विविध संघटना व सर्वपक्षीयांकडून मूक मोर्चा काढण्यात आला. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे व विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी या प्रकरणी करण्यात आली होती.

नेमके प्रकरण काय?

बलात्कार व हत्येचे प्रकरण उजेडात आल्यानंतर आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमीत पाटील यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करून दिला. त्यात पीडित कुटुंबीयांनी हा खटला फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगत पोलिसांशी बोलतो असे म्हणत त्यांची बोळवण केली. हा प्रकार निदर्शनास येताच यूट्यूब पत्रकार संदीप महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची ‘चमकोगिरी’ अशा आशयाची बातमी दिली.

कारवाईची मागणी 

महाजन यांच्या वृत्तामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क साधत त्यांना शिवीगाळ केली. तू कुठे राहतो? तुझे हात-पाय तोडतो अशी धमकी त्यांनी दिली. या संभाषणाची ऑडियो क्लिप व्हायरल झाली असून किशोर पाटील यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

‘होय, मी केली शिवीगाळ -पाटील

या प्रकरणी आमदार किशोर पाटील यांना छेडले असता त्यांनी आपण सदर पत्रकाराला शिवीगाळ केल्याचे मान्य केले. ते म्हणाले की, जी क्लिप व्हायरल होत आहे, ती निश्चितपणे माझीच आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मुख्यमंत्री चमकोगिरी करतात, अशी तुमची पत्रकारिता आहे का? जर असं म्हणत असाल तर माझ्या नेत्यासाठी, माझ्या मुख्यमंत्र्यांसाठी मी शिवीगाळ केली. ज्याला घटनेचं गांभीर्य नाही, अशा पत्रकाराला मी शिव्या दिलेल्या आहेत.

Spread the love