जळगाव – जळगाव जिल्ह्यात एका सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचखेडा शिवारामध्ये एका सहा वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत तिचा खून करून फेकून दिल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक 11 जून रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारे आदिवासी कुटुंब मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. सदर बालिकेचे आई- वडील मंगळवारी मोल मजुरीसाठी बाहेर गेले असताना बालिका घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेत संशयित आरोपी सुभाष इमाजी भिल (वय 35 रा. चिंचखेडा) याने सदर मुलीला घराबाहेर बोलून तुला चॉकलेट घेऊन देतो असे आमिष दाखवले.
त्यानंतर गावाच्या बाहेर केळीच्या मळ्यात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करून पसार झाला. मुलीचे आई वडील मजुरी करुन घरी परतले असता त्यांना मुलगी घरात न दिसल्याने त्यांनी मुलीचा शोध सुरु केला. यावेळी चिमुकल्या मुलीचा गावाबाहेर केळीच्या बागेत रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला. काल रात्री 11 वाजता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.
या घटनेनंतर आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.