भुसावळ – येथे धमकवण्याचा अजबच प्रकार समोर आला आहे. अश्लील चित्रफित पाठविल्याच्या प्रकरणात तोडीपाणी करण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेस भुसावळ पोलीसांन कडुन अटक करण्यात आली असून याच प्रकरणातील पाच जण फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील लोणारी मंगल कार्यालयाजवळील रहिवासी निलेश चौधरी हे आपल्या मित्राच्या बुलेटवरून पिंप्रीसेकम शिवारात फिरण्यासाठी गेले होते. याप्रसंगी लीना तल्हारे या महिलेने तीन जणांसह त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यामुळे ते पळत जवळच काम सुरू असलेल्या इमारतीत पळाले. तेथे या महिलेने अजय गोडाले, शुभम पचेरवाल आणि इतरांना बोलावून घेतले. या सर्वांनी निलेशवर दबाव टाकत पाच लाख रूपयांची मागणी केली. निलेश चौधरी याने लीना तल्हारे यांच्या मोबाईलवर अश्लील क्लीप टाकण्याचा आरोप करत त्याने पाच लाख रुपये द्यावे यासाठी या सर्वांनी त्यांना धमकावले. निलेश चौधरी यांनी पाच लाख रूपये रक्कम देण्यासाठी नकार दिल्यानंतर या सर्वांनी त्यांना मारहाण केली.
तसेच निलेश चौधरी हे पैसे देत नसल्यामुळे त्याच्या मालकीच्या एमएच १९ सीव्ही-६४८७ क्रमांकाच्या टाटा हॅरीयर या गाडीला लीना तल्हारे हिला विक्री करण्याचे दाखविण्यासाठी एका वकिलास बोलवण्यात आले. व निलेश चौधरी यांनी लीना तल्हारे यांना ही कार विकल्याची नोटरी तयार करण्यात आली. निलेश डिगंबर चौधरी यांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात फिर्याद दिली यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील महीला आरोपीत लिना कृष्णा तल्लारे (वय-५१ वर्षे रा. वरणगांव रोड, साक्री फाटा, भुसावळ) हिला आज दुपारी अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणात अजय गोडाले, शुभम पचरवाल ( दोन्ही रा. भुसावळ) आणि तीन अनोळखी इसम असे एकूण पाच जण फरार झाले आहेत.