वैद्यकिय अधिकाऱ्यांचे दोन्ही पद रिक्त असल्याने… साकळी प्रा.आ.केंद्रच आता ‘सलाईनवर’!

0
50

केंद्रातील तब्बल १४ पदे रिक्त केंद्राचा कारभार ‘ रामभरोसे ‘

साकळी – साकळीसह परिसरातील गावातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दोन्ही पद रिक्त असल्याने साकळीची संपुर्ण आरोग्य यंत्रणाच आता सलाईनवर असून संपूर्ण रुग्णसेवाच वाऱ्यावर आहे. या आरोग्य केंद्रातील दोघं वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांच्या तब्बल १४ जागा रिक्त असल्याने फक्त चार कर्मचाऱ्यांवर साकळीचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज चालते कसे? हाच मोठा प्रश्न आहे. तरी जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने साकळीच्या आरोग्य केंद्राकडे लक्ष द्यावे तसेच कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्या अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
या बाबत सविस्तर असे की,साकळीसह पंचक्रोशितील तब्बल २५ ते ३० गावांतील नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी व त्यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी शासनाच्या एन.आर.एच.एम.अंतर्गत साकळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. शासनाच्या आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार २४x७ या नुसार कामकाज व्हावे या उद्देशाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत केंद्राअंतर्गतच्या गावांमध्ये वेळोवेळी अनेक आरोग्य विषयक उपाययोजना, कार्यक्रम, उपक्रम,
लसीकरण राबवली जात असतात.गावातील साफसफाई तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्राला लक्ष ठेवावे लागते. या प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांच्या विविध आजारांवर प्राथमिक उपचारांसोबत गरोदर महिलांची डिलिव्हरी, कुटुंबनियोजनाचे ऑपरेशन यासह काही गंभीर आजारांवर उपचार करणे असे आरोग्य संबंधी कामकाज केले जाते.

या केंद्रात बऱ्यापैकी आरोग्य सुविधा असून केंद्र नागरिकांच्या आरोग्याचा मोठा आधार आहे. तसेच या आरोग्य केंद्राअंतर्गत सहा उपकेंद्र आहे. हा सर्व कामकाजाचा पसारा पहाता या प्रा.आरोग्य केंद्रासाठी पुरेसा कर्मचाऱ्यांचा स्टॉप पाहीजे आहे. यात प्रामुख्याने दोन कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती गरजेचे आहे.मात्र गेल्या काही काळापासून या केंद्रातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या तर काही सेवानिवृत्त झाल्याने तसेच नव्याने भरती न झाल्याने अनेक पदे रिक्त झालेले आहे.यात मिळालेल्या माहितीनुसार, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी २ जागा, औषध निर्माता १ जागा, आरोग्य सहाय्यक व सहायिका प्रत्येकी एक प्रमाणे २ जागा,आरोग्य सेविका ५ जागा, लॅब टेक्निशियन १ जागा, शिपाई २ जागा, स्वीपर १ जागा यानुसार तब्बल १४ जागा रिक्त आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या कारभाराचा पूर्णपणे बोजबारा उडालेला असून फक्त चार कर्मचाऱ्यांवर केंद्राचा कारभार कसाबसा सुरू आहे. ज्याला जे काम जमत नाही अथवा देण्याची गरज नाही ते काम त्या कर्मचाऱ्याला नाईलाजास्तव करावे लागत आहे. या दरम्यान रात्री बेरात्री आपत्कालीन परिस्थितीत एखादी रुग्ण केंद्रात दाखल झाला तर त्या रुग्णाच्या उपचारासाठी केंद्रात डॉक्टर नसल्याने त्या रुग्णाचं काय होणार? या बाबीचा विचार न केलेला बरा एवढी गंभीर परिस्थिती आहे. तसेच परिसरातील उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी (सी.एच.ओ.)हे केंद्राची रोजची ओपीडी सांभाळत केंद्र कसे बसे चालवित आहे.

दरम्यानच्या काळात करार पद्धतीने सेवेत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. तबरेज खान व डॉ. मुकेश बागुल यांनी वैद्यकीय उच्च शिक्षणाच्या कारणाने वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार सोडलेला असल्यामुळे आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे डॉक्टर साहेबांची ‘खुर्ची’ चक्क रिकामी आहे.तर केंद्राचा आर्थिक व्यवहाराचा चार्ज किनगांवच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांकडे आहे.अश्या प्रकारे सदरील प्रा. आ. केंद्राचा कारभार पुर्णपणे रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.
तरी साकळी प्रा.आ.केंद्राच्या रामभरोसे कारभाराकडे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, खा.रक्षाताई खडसे, आ. सौ. लताताई सोनवणे, जळगाव जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आरोग्य विभागाने गांभिर्यपुर्वक लक्ष दयावे तसेच केंद्रातील
कायमस्वरूपी दोघं वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर सर्व कर्मचाऱ्यांचे पदे तात्काळ भरण्यात यावी व गावकऱ्यांचा आरोग्य सेवेचा सोडविला जावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Spread the love