नीट परीक्षेमध्ये दोनदा नापास झालेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मुलाच्या मृत्युचे वृत्त कळताच वडिलांनीही जीवन संपवले. तामिळनाडूतील चेन्नई येथे ही धक्कादायक घटना घडली. यावरून राजकारण सुरू असतानाच आता मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी लवकरच ही परीक्षा राज्यातून हद्दपार करण्याची घोषणा केली.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जगदीशस्वरन (Jagasdeswaran) हा 19 वर्षीय विद्यार्थी 2022मध्ये 85 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण झाला होता. वैद्यकीय शिक्षण घेण्याचे त्याचे स्वप्न होते. परंतु दोनदा नीट परीक्षा देऊनही तो पास झाला नाही. यामुळे निराश झालेल्या जगदीशस्वरन याने राहत्या घरी आत्महत्या केली. परीक्षेत नापास झाल्याने मुलाने मृत्युला कवटाळल्याचे कळताच वडिलांनीही गळफास घेतला. सेल्वा सेकर असे त्यांचे नाव आहे.
परीक्षाच हद्दपार करण्याची घोषणा
मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी नीट परीक्षा राज्यातून हद्दपार करण्याची घोषणा केली आहे. ही परीक्षा लाखो रुपये परवडणाऱ्या लोकांसाठी असल्याचे ते म्हणाले. बारावीत कमी गुण मिळालेले विद्यार्थी लाखो रुपये खर्च करून शिकवणी लावतात आणि नीट परीक्षा पास होतात. ही परीक्षा श्रीमंतांची मक्तेदारी झाली आहे.










