महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन दीड आठवड्याहून अधिक कालावधी झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता उमेदवारांची रेलचेल दिसून येत आहे.
असं असतानाच आता राज्य सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे तर निकाल 23 तारखेला लागणार आहे. असं असतानाच आता राज्य सरकारने 20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
या आदेशाचं उल्लंघन केलं तर…
20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर करत असल्याचं परिपत्रक राज्य सरकारने जारी केलं आहे. प्रत्येक मतदान करणाऱ्या व्यक्तीसाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या प्रत्येक उपक्रम व आस्थापनेला लागू राहणार आहे. पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानासाठी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी वा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सदर आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असंही सांगण्यात आलं आहे.
निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावणं हा संवैधानिक अधिकार असून तो बजावताना अडथळा येऊ नये म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाते. यंदा महाराष्ट्रामध्ये मतदान बुधवारी असल्याने महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मतदानानिमित्त मीडवीक ऑफ मिळणार आहे. मात्र या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं जात आहे.