राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदचे १६ मार्च रोजी एरंडोल येथे आयोजन 

0
39

जळगाव :- दिनांक १६ मार्च २०२५ रोजी एरंडोल येथील हॉटेल कृष्णा मैदान येथे एक दिवसीय राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदचे आयोजन करण्यात आलेआहे. परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनंत राऊत असतील, आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते उदघाटन होणार असून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अमोल पाटील मुख्यअतिथी म्हणून परिषदेस उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती परिषदेचे मुख्य संयोजक प्रा. भरत शिरसाठ यांनी दिनांक १२ मार्च रोजी पत्रकार भवन , जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली .

या पत्रकार परिषदेस स्वागताध्यक्ष शालिकभाऊ गायकवाड , साहित्यिक जयसिंग वाघ , भैय्यासाहेब सोनवणे , धनराज मोतिराय , भंते अमरज्योती हजर होते.

सकाळी आठ वाजता संविधान रॅली आहे यात पूज्य भदंत गुणरत्न महाथेरो , पूज्य भदंत नागसेन , पूज्य भदंत अमरज्योती पूज्य भदंत संघरक्षित सहभागी होणार आहेत . ९ ते ११.३० उदघाटन सत्र असून यात स्मरणिका प्रकाशन, ग्रंथ प्रकाशन , संविधान लढा चेतना पुरस्कार प्रदान , संविधान निर्मिती चित्र प्रदर्शन व मान्यवरांची भाषणे होणार आहे. प्रथम परिसंवाद धर्माधिष्ठित संविधान निर्मितीचा प्रयत्न हा भारताच्या सार्वभौमत्वाला व अखंडत्वाला धोका आहे या विषयावर होणार असून अध्यक्षस्थानी संघराज रूपवते राहणार आहेत तर जयसिंग वाघ व शमिभा पाटील हे आपले विचार मांडणार आहेत.

दुसरा परिसंवाद भारतीय संविधानाला  सामाजिक, आर्थिक समता प्रस्थापित झाली आहे का ? या विषयावर असून अध्यक्षस्थानी श्रीरंजन आवटे राहणार असून नुरखां पठाण व प्रा. डॉ. राहुल निकम वक्ता म्हणून विचार मांडणार आहेत .

तिसऱ्या परिसंवादाचा विषय भारतीय संविधानास अपेक्षित स्त्री पुरुष समानता व देशातील स्त्री स्वातंत्र्याचा प्रश्न एक गंभीर प्रश्न असून याच्या अध्यक्षस्थानी किरण सोनवणे असतील तर डॉ. सरोज डांगे व डॉ. लीलाधर पाटील आपले विचार मांडणार आहेत. सायंकाळी पाच वाजता संविधान मूल्ये जनजागृती पुरस्कार वितरण तसेच संविधान मूल्ये जनजागृती संघ स्थापना करून पदाधिकाऱ्यांना पत्र वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर प्रा. डॉ. शुक्राचार्य गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली  कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे यात विजयकुमार कस्तुरे , शशिकांत हिंगोनेकर , डॉ. मिलिंद बागुल यांचेसह तीस कवी आपल्या कविता सादर करतील.या परिषदेस राज्यभरातून तीनशे प्रतिनिधी सहभागी होणार असून सुमारे एक हजार श्रोते उपस्थित राहतील अशी माहिती प्रा. भरत शिरसाठ यांनी दिली . सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन भैय्यासाहेब सोनवणे यांनी केले .

Spread the love