दिपक नेवे
यावल -विद्यार्थ्यांनो या पुढील येणारा काळ हा अतिशय स्पर्धेचा व आव्हानांचा असणार आहे. त्या दृष्टीने आपण आपले भविष्यातील ध्येय आजच निश्चित करायला पाहिजे व त्या दृष्टीने आपण वाटचाल करायला हवी व तयारीत असले पाहिजे. भविष्यात २०४० पर्यंत आपल्या देशासह जगभरात प्रत्येक क्षेत्रात आधुनिक काळाच्या प्रवाहात मोठे बदल घडतील व त्या दृष्टीने रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. त्यादृष्टीने आपली करियर वाट आजच निवडा. दिवसेंदिवस काळानुसार शिक्षणप्रणालीत सुद्धा मोठे बदल होत आहे व ही आपल्यासाठी खूप फायद्याचे आहे. असे प्रतिपादन जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व्याख्याता पी.पी. गढे(यावल) यांनी केले.
ते साकळी ता. यावल येथील जय दुर्गा मित्र मंडळ (बाजारपेठ) साकळी यांच्या वतीने दि.१४ रोजी आयोजित ‘ ध्येय आयुष्याचे ‘ या मार्गदर्शनपर व्याख्यानमालेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.याप्रसंगी व्यासपिठावर शारदा विद्या मंदिर शाळेचे उपशिक्षक एस.पी.निळे (सर), यावल येथील सामाजिक कार्यकर्ते सारंग बेहेडे , देवी मंडळाचे उपाध्यक्ष शशिकांत नेवे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते देवीचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर व्याख्यानाला सुरुवात करण्यात आल .श्री गढे पुढे म्हणाले की, आज आपण म्हणतो की मी या देशात जाऊन आलो त्या ठिकाणी जाऊन आलो तसे २०४० पर्यंत आपण आतील बरेचजण चंद्रा सह इतर ग्रहांवर जाऊन येतील तर काहीजण आकाशभ्रमण करून येतील. त्यावेळची स्थितीत खूप मोठी टेक्नॉलॉजी विकसित झालेली असेल तेव्हा आपणही सज्ज राहावे .
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी,विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ जैन (सर) यांनी केले तर आभार रितेश नेवे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.












