अस्पृश्यांना नव्याने सैन्यात भरती करावयास लावणारे सुभेदार रामजी सकपाळ

0
8

भारतात ३१ डिसेंबर १६०० मध्ये आलेल्या इस्ट इंडिया कंपनीने साधारणतः १७४० पासून कंपनीच्या संरक्षणासोबत सोबत अन्य बाबीं करिता सैन्य भरती सुरू केली . १७५० ला मोठयाप्रमाणात सैन्य भरती करून कंपनी युद्धात सुद्धा उतरली . १८२३ पर्यंत त्यांची सैन्यसंख्या लाखाच्या घरात पोहचली . उत्तम प्रशिक्षणामुळे हे सैन्य भारताच्या विविध भागात कंपनीचे साम्राज्य विस्तारण्यात यशस्वी होत गेले . सैन्य भरती करत असताना कंपनीने कोणतीही जात पाहिली नाही त्यामुळे अस्पृश्य समाजातील लोकांना नोकरी मिळत गेली .
अस्पृश्य समाज हा काटक , लढाऊ , निर्भिड तसाच मरणाला न घाबरणारा असल्याने या समाजाला कंपनीने प्राधान्य देऊन सैन्यात भारती केले . विविध जबादाऱ्या त्यांच्यावर टाकल्या गेल्या. काही तुकड्यांचे ते प्रमुख झाले . अस्पृश्य समाजाच्या सैन्यामुळे कंपनीला विविध युद्धात यश मिळत गेले . मोगलांचा निप्पात केल्या नंतर तर कंपनीला कोणी शत्रूच उरला नव्हता .
कंपनीने अस्पृश्य समाजास सैन्यात भरती केल्यामुळे अनेक अस्पृश्य समाजाचा आर्थिक विकास झाल्याने त्यांचे जीवनमान बदलून गेले होते . त्यांचे राहणीमान , खानपान यात खूप बदल झाला . अन्य लोकांसोबतची त्यांची उठबस वाढली तेंव्हा अस्पृश्य समाजाची होत असलेली ही प्रगती लक्षात घेता अस्पृश्य लोकांना सैन्यात भरती करू नये म्हणून कंपनीवर काही अस्पृश्य समाज विरोधकांचा दबाव वाढत गेला . कंपनीच्या विस्तारा करिता सवर्ण समाज कसा फायदेशीर राहील याची सविस्तर मांडणी मुख्य सेनापती कीचर यांच्या समोर करण्यात आली. १८५७ ला कंपनी विरुद्ध भारतात मोठे बंड झाले अर्थात त्यात कंपनीला विजय मिळाला मात्र भारतात कंपनी सरकार जाऊन १८५८ ला सरळ इंग्रज सरकारची राजवट सुरू झाली . इंग्रज सरकारवर सुद्धा अस्पृश्य सैन्य भरती रद्द करणे बाबत दबाव वाढत गेला . सवर्ण समाजास खुश करण्या करीता व आर्थिक नफा जास्तीत जास्त मिळविण्याच्या हेतूने सन १८९१ मध्ये सर्व अस्पृश्य सैनिकांना नोकरीतून कमी केले गेले व या पुढं अस्पृश्य समाजाची सैन्यात भरती करण्यात येऊ नये असा लेखी आदेश इंग्रज सरकारने काढला .
सुभेदार रामजी सकपाळ ( आंबेडकर ) हे १८६६ मध्ये सैन्यात भरती झाले होते . सैन्यात राहून त्यांनी सैनिकी शाळेत इंग्रजीतून मॅट्रिक केल्याने त्यांना सैनिकी प्रशिक्षण शाळेत शिक्षक म्हणून नेमले गेले . रामजी याचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते तसेच त्यांना गणित विषयात सुद्धा आवड होती . त्यांचे शिक्षण , इंग्रजीचे ज्ञान व गणिताची आवड पाहून सरकारने त्यांच्यावर शिक्षणाच्या विविध जबाबदाऱ्या दिल्या . पुढं १८८० ला ते मुख्याध्यापक झाले. पुढं त्यांना सुभेदार म्हणून ओळखले जाऊ लागले .
१८९१ च्या सरकारी आदेशाने सुभेदार रामजी फार व्यथित झाले या आदेशा विरुद्ध अस्पृश्य समाजात असंतोष निर्माण झाला होता . सुभेदार रामजी यांनी सरकारच्या या निर्णया विरुद्ध लढण्याचा मानस काही सहकारी लोकांना बोलून दाखविला . तेंव्हाचे अस्पृश्य समाजाचे पुढारी गोपाळ बाबा वलंगकर यांची त्यांनी स्वतंत्र भेट घेऊन या बाबत चर्चा केली , काही अस्पृश्य सैनिकांची बैठक बोलावली त्यांनाही आपली बाजू समजून सांगितली सर्व सहकारी त्यांच्या मताशी सहमत झाले तेंव्हा एक निवेदन तयार करून त्यांनी काही अस्पृश्य सैनिकांच्या सह्या घेतल्या . गोपाळ बाबा वलंगकर यांच्या भेटी करिता ते या सर्व सैनिकांना घेऊन गेले . गोपाळ बाबांनी ते निवेदन वाचून ताबडतोब मुख्य सेनापतीला पाठविण्याचे सांगितले त्या नुसार रामजी सकपाळ यांनी ते निवेदन पाठविले .
सरकार दाद देत नाही असे दिसून आल्या नंतर रामजी सकपाळ यांनी पुन्हा गोपाळ बाबा यांची भेट घेतली तेंव्हा गोपाळ बाबा यांनी रीतसर वकिलामार्फत एक नोटीस तयार केली . त्या नोटीसला रामजी सकपाळ व अन्य सैनिकांचे निवेदन व इतर माहितीचे एक निवेदन मुख्य सेनापती यांना रजिस्टर पोस्टाने पाठविले . त्याची पोच रीतसर मागून घेतली . अस्पृश्य समाजास सैन्यात भरती करण्या बाबत रामजी बाबा व गोपाळ बाबा यांनी १८९१ पासून सारखा पाठपुरावा केला . रामजी बाबा वेळोवेळी इंग्रज अधिकाऱ्यांची भेट घेऊन बाजू मांडू लागले . त्याचा परिणाम १८९५ ला झाला . कंपनीने १८९५ ला १८९१ च्या आदेशाने बंद केलेली अस्पृश्य सैन्य भरती रद्द करणारा नवा आदेश काढला . या नव्या आदेशाने १८९५ पासून पुन्हा अस्पृश्य समाजास सैन्यात घेणे सुरू झाले . या अस्पृश्य सैनिकांनी ब्रिटिशांना महायुद्ध सारख्या कठीण प्रसंगात सुद्धा विजय मिळवून दिला .
ब्रिटिश सरकार विरुद्ध एक लढाई लढणाऱ्या व त्यात विजय संपादन करणाऱ्या सुभेदार रामजी सकपाळ ( आंबेडकर ) यांचा आज २ फेब्रुवारी रोजी स्मृतिदिन आहे . रामजी बाबा यांना त्या निमित्त त्रिवार अभिवादन .
लेखक……… जयसिंग वाघ
अजिंठा हाउसिंग सोसायटी , अजिंठा चौक, जळगाव
संपर्क …..९८८१९२८८८१

Spread the love