प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच एकनाथ फुलसिंग सपकाळे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या बाबत प्रेस नोट काढून त्यांनी निवेदनात म्हटले आहे की , गावातील ग्रामस्थांना शासकिय योजनांचा लाभ मिळत नाही तसेच गरजू लोकांना शासकिय योजना पासून दुर ठेवले जाते. त्यामुळे ग्रामस्थ आपल्याकडे तक्रारीचा पाढा वाचत असताना शासन दरबारी पाठपुरावा करून ही गावातील गरजूंना न्याय मिळत नसल्याने आपला पदावर राहून फायदा नाही. त्यामुळे उपसरपंच पदाचा राजीनामा देणार असल्याचे पत्रात म्हटले असून लवकरच ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणणार असल्याचे उपसरपंच एकनाथ सपकाळे यांनी सांगितले आहे. उपसरपंच पदाचा कार्यकाळ दोन वर्ष उलटून देखील गावात विकास मात्र शुन्य आहे. निवडणुक लढवीते वेळी मतदारांना दिलेल्या आश्वासनावर पाणी फिरत आहे. वार्डात किंवा गावात सुविधा पुरविल्या जात नसल्यामुळे गावातील ग्रामस्थांनमध्ये नाराजी पाहावयास मिळत आहे. सरपंच सौ काजल कोळी या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने ग्रामपंचायतीचा कारभार चालवत असल्याने सदस्यांनमध्ये देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे ग्रामपंचायत कार्यालयाची आयएसओ प्रणाली कडे वाटचाल सुरू असताना उपसरपंच यांच्या राजीनामाच्या पत्राने खळबळ उडाली असून राजीनामा देण्याचे नेमके कारण जनते समोर लवकरच येणार असल्याचे सांगीतले जाते आहे.











