सुनसगाव – येथील वाघुर नदीच्या पात्रात अज्ञात व्यक्तिंनी मृत मासे असलेले खोके नदी पात्रात फेकल्याने नदीचे पाणी दूषित व दुर्गंधीयुक्त झाले आहे या प्रकाराने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
या बाबत माहिती अशी की, येथील वाघुर नदीवर नशिराबाद – सुनसगाव जोडणारा पूल आहे. या पुलाच्या उत्तर दिशेला अज्ञात व्यक्तिंनी नदी पात्रात मृत मासे असलेले खोके फेकले त्यामुळे मेलेले मासे सडल्याने पाण्याचा दुर्गंधीयुक्त ऊग्र वास येतो आहे. या नदी पात्रा शेजारी आदिवासी भिल्ल समाज वस्ती असून तेथे माजी पोलीस पाटील प्रकाश मालचे व माजी ग्रामपंचायत सदस्य शामराव मालचे यांचे घर आहे. पाण्याची दुर्गंधी येत असल्याने माजी पोलीस पाटील प्रकाश मालचे हे नदीच्या पात्रात उतरल्यावर त्यांनी पाण्यात पाहिले असता मृत मासे फेकल्याचे निदर्शनास आले तसेच काही मासे ठेवण्यासाठी असलेले थर्माकोलचे खोके पाण्यात तरंगत असल्याचे दिसले. यावेळी प्रकाश मालचे यांनी पाण्यातून खोके बाहेर काढले मात्र पाण्यात मृत मासे सडत आहेत.
वास्तविक पाहता या पुलाजवळ गावाला पाणीपुरवठा करणारी विहिर आहे त्यामुळे हे दूषित पाणी विहिरीत गेल्यास ग्रामस्थांच्या आरोग्याला हानिकारक आहे.
या पुलावरून दिवसरात्र वाहतूक सुरू असते. माजी पोलीस पाटील प्रकाश मालचे यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी ताबडतोब खोके बाहेर फेकले. मृत मासे नदीच्या पात्रात फेकण्याची गरज काय होती? जाणूनबुजून नदीच्या पात्रात मृत मासे फेकण्याचे कारण काय? नदी पात्रात मृत मासे फेकणाऱ्याचा शोध घेणे गरजेचे असून अशा विकृत लोकांना पोलीसांनी धडा शिकवावा असे बोलले जात असून असा प्रकार कोणीही करु नये आवाहन पत्रकार जितेंद्र काटे यांनी केले आहे.