प्रतिनिधी- जितेंद्र काटे
भुसावळ :- तालुक्यातील सुनसगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेच्या अजेंड्यावर मागील सभेचे प्रोसिडींग वाचून कायम करणे , मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान राबविणे तसेच वाईन शॉप दुकानाला परवानगी देणे असे विषय होते .सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.काजल कोळी होत्या यावेळी ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती प्रतिभा तायडे यांनी विषय वाचायला सुरवात केली .सुरवातीच्या दोन विषयावर चर्चा शांततेत पार पडली मात्र वाईन शॉप दुकानाला परवानगी मिळावी यासाठी सागर शिरसाळे यांच्या अर्जाचे वाचन करण्यात आल्यावर महिलांनी सुरवातीला शांततेत नकार दिला तसेच आजतागायत झालेल्या ग्रामपंचायतीत दारु दुकानासाठी परवानगी हा विषय आला नाही तसेच अशा दुकानाला परवानगी मिळावी यासाठी विशेष सभा घेण्याचा प्रसंग आला नाही त्यामुळे महिलांनी तिव्र नाराजी व्यक्त केली तसेच गावातील तरुण दारुच्या आहारी गेल्याने काही तरुणांचा मृत्यू झाला तर काही तरुण आजारी पडलेले असून मृत्यूच्या घटका मोजत आहेत तसेच दारुचे दुकान सुरु झाले तर तरुणपिढी दारुच्या आहारी जाईल व अनेकांचे संसार उघड्यावर येतील असे सांगत महिलांच्या ग्रामसभेत विरोध करण्यात आला तसेच परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर त्याच ठिकाणी सर्वसाधारण सभा घेण्यात आली यावेळी सुध्दा महिलांनी तिव्र विरोध दाखवत परवानगी नाकारली विशेष म्हणजे सर्वसाधारण सभेत दोन तीन पुरुषांनी विरोध दाखवला तर काही पुरुष मूगगिळून बसलेले पाहायला मिळाले .यावेळी एका महिला ग्रामपंचायत सदस्याने ग्रामसभेत बसलेल्या महिलांशी बोलण्यातून काही काळ वाद निर्माण झाला व महिला ग्रामपंचायत सदस्य व गावातील महिलांमध्ये ‘ तू तू मैं मैं ‘ पाहायला मिळाली मात्र पोलीसांनी समजवून सांगत वाद मिटवला. तसेच ग्रामपंचायतीने वाईन शॉप च्या दुकानाला परवानगी दिली तर ग्रामपंचायत कार्यालय व वाईन शॉप च्या दुकानावर हल्लाबोल करणार असल्याचे सांगत महिलांनी परवानगी नाकारली.विशेष म्हणजे इतर ग्रामसभांना बचत गटाच्या महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते मात्र या विशेष सभेला ठराविकच महिला उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. यावेळी काही तरुणांनी परवानगी घ्यावी असे सांगीतले मात्र महिलांनी सक्त विरोध केल्याने वाईन शॉप दुकानाच्या परवानगीचा विषय नामंजूर करण्यात आला आहे.
या बाबत ‘ जळगाव संदेश ‘ भुसावळ तालुका प्रतिनिधी यांनी सरपंच सौ.काजल भोजराज कोळी यांना विचारले असता महिला ग्रामपंचायत सदस्य शोभाबाई शिरसाळे यांचा मुलगा सागर शिरसाळे यांनी निळकंठ राजाराम भोळे यांच्या मालकीच्या गट नं.७१२ मध्ये वाईन शॉप दुकानासाठी ना हरकत व परवानगी मिळावी म्हणून ग्रामपंचायती कडे अर्ज सादर केला होता त्या बाबत दि.११ डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभेत महिला व सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही सभेत महिलांनी या अर्जाला विरोध केला त्यामुळे परवानगी नाकारण्यात आली आहे असे सरपंच यांनी ‘ जळगाव संदेश ‘ शी बोलताना सांगीतले आहे. यावेळी गावातील पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर काही ग्रामस्थांनी फक्त प्रोसिडिंग बुकावर स्वाक्षरी करुन बघ्याची भूमिका घेतली यावेळी गावातील अवैधधंदे व दारुविक्री बंद करण्यात यावी अशी मागणी सभेत केली.












