सुनसगावचा पाच नंबर लाकूडतोडीने होतय बोडका ?

0
30

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील ग्रामपंचायत मालकीच्या राखीव पाच नंबर शिवारात अंजनाच्या झाडांची कत्तल केली जात असल्याने हा परिसर बोडका होण्याच्या मार्गावर आला असून ही झाडांची कत्तल रोखण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेले झोपेचे सोंग आता दूर करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

येथील वाघुर नदीच्या काठावर ग्रामपंचायत मालकीचे पाच नंबर शिवार आहे.या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षापासूनची अंजनाची झाडे आहेत तत्कालीन सरपंच दामू पांडू पाटील व त्यांचे बंधू हरी पांडू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या मदतीने जवळपास एक हजार अंजनाच्या झाडांची लागवड करण्यात आली होती विशेष म्हणजे त्या काळात एक रुपया घागर प्रमाणे या झाडांना पाणी पुरवठा केला जात होता. अशा परिस्थितीत या झाडांचे संगोपन करण्यात आले होते. तसेच याच काळात समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कल्पनेतून आदर्श गाव दत्तक योजना राबविण्यात आली होती आणि या अंजनाच्या झाडांचा पाला गुरांना खाऊ घालून दुधदुपते वाढविण्यात यावा अशी अपेक्षा होती. मात्र काही वर्षापासून या पाच नंबर शिवाराला एक प्रकारे नजर लागली आणि तत्कालीन पदाधिकारी यांनी फक्त पद आणि पैसा (JSNN)  हा उद्देश ठेवला आणि अंजनातील मोठमोठी झाडे गायब होऊ लागली आज ही अनेक झाडे तोडून नेण्यात येत आहेत रातोरात झाडे गायब केली जात आहेत मात्र कोणीही बोलायला तयार नाही .गावातील पदाधिकाऱ्यांप्रमाणे ग्रामस्थांनी सुध्दा झोपेचे सोंग घेतले आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

आज ही या पाच नंबर शिवारात झाडे तोडून ठेवलेली आहेत फक्त घेऊन जायला वेळ मिळत नसल्याने झाडे जागेवर पडून आहेत. अंजनातील झाडे वाचवणे ही आज गरज आहे त्यासाठी गावातील तरुणांनी एक होणे गरजेचे आहे.

ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी ठरवले तर या पाच नंबर शिवारातून एक ही झाड चोरी होऊ शकणार नाही मात्र ही आपली आणि आपल्या गावाची संपत्ती आहे हे कोणालाही वाटत नाही त्यामुळे की काय या अंजनाच्या झाडांची कत्तल होऊन पाच नंबर परिसर बोडका होतांना दिसत आहे.

चौकट – गावाला खमक्या कार्यकर्त्याची गरज.

सुनसगावाला एखाद्या खमक्या कार्यकर्त्याची गरज असल्याचे बोलले जाते आहे गावाच्या संपत्तीची बिनधास्त पणे वाट लावली जाते आहे मात्र कोणीही पदाधिकारी बोलायला तयार नाही. गावाच्या विकासासाठी पुढे यायला तयार नाही की गावाची हक्काची गौणखनिज संपत्ती सांभाळण्यासाठी कोणीही बोलायला तयार नसल्याने गावातून एखादा खमक्या कार्यकर्ता पुढे यावा अशी चर्चा सुरू आहे.

Spread the love