सुनसगावजवळील रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटवण्याची मागणी, दुकानदारांची गैरसोय

0
23

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव-गोजोरा रस्त्याच्या रुंदीकरण आणि कॉंक्रिटीकरणामुळे वाहनधारकांना अडचणी येत असतानाच, आता या रस्त्यावर काम करणाऱ्या ठेकेदाराने बेपर्वाईने मातीचे ढिगारे दुकानांसमोर टाकल्याने दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊन उपासमारीची वेळ आली आहे, अशी तक्रार स्थानिक दुकानदारांनी केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक आधीच मंदावली आहे. त्यातच, सुनसगावजवळ असलेल्या बेलव्हाळ चौफुलीवर मोरीचे काम सुरू आहे. या कामातून काढलेली माती संबंधित ठेकेदाराने निष्काळजीपणे परिसरातील दुकानांसमोरच टाकली आहे. यामुळे दुकानांमध्ये ये-जा करण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.

याबाबत अनेकवेळा ठेकेदाराला विनंती करूनही माती हटवण्यात आली नाही, असे दुकानदारांनी सांगितले. यामुळे त्यांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला असून, उत्पन्न थांबले आहे.

या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या आनंदा लोहार, कैलास लोहार, भोला कोळसे, आणि सुनील पाटील यांच्यासह इतर दुकानदारांनी प्रशासनाकडे तातडीने या मातीचे ढिगारे हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी केली आहे. जर यावर लवकर तोडगा काढला नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. प्रशासनाने यावर त्वरित लक्ष घालून दुकानदारांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Spread the love