प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शाळेच्या रस्त्यावर असलेल्या रोहित्राच्या खांबात विजप्रवाह उतरल्याने या विजेचा धक्का बसल्याने म्हैस ठार झाल्याची घटना दि.२४ रोजी सकाळी ११ वाजता घडली.
या बाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात म्हैस मालक संजय मुरलीधर बोदडे रांनी खबर दिली की सकाळी गावातील व स्वताच्या म्हशी रानात चारण्यासाठी घेऊन जात असताना गावातील रोहित्र क्रमांक ६०१ जवळ वाढलेले गवत खाण्यासाठी जाफरी जातीची एक लाख रुपये किंमतीची म्हैस गेली असता विज खांबा जवळील तारांचा स्पर्श होताच म्हैस ठार झाली यावेळी संजय बोदडे व सुपडू कंखरे यांनी म्हशीला ओढण्याचा प्रयत्न केला असता या दोघांना ही शाँक बसला. या घटनेचा पोलीस पंचनामा व म्हशीचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वी सुनसगाव शिवारात जगन्नाथ चांगो कंखरे यांच्या बैलाला विज तारांचा शाँक लागून बैल मयत झाला होता. अशा घटना होऊ नये म्हणून विजवितरण कंपनीने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या विज रोहित्रा जवळ नेहमी चिखल असतो तसेच सध्या पावसाळ्याचे वातावरण असल्याने नागरीकांनी तसेच गुरेढोरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले असून म्हैस मालकाने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरुन हायस्कूल मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी ये जा करीत असतात मात्र रविवार असल्याने शाळेला सुट्टी होती अन्यथा काही अनर्थ घडला असता असे नागरीकांनी सांगीतले.