ठाकरे गटाला दिलेल्या राजीनाम्यानंतर सुरेश जैन यांचा महायुतीला पाठिंबा!

0
44

भाजपात होणार सामील?

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काल ठाकरे गटाला  पुन्हा एक मोठा धक्का मिळाला. ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांनी ठाकरे गटाला काल रामराम ठोकला. यानंतर ते थेट जळगावात दाखल झाले. मात्र, यानंतर कोणती भूमिका घेणार हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. मतदानासाठी आपण जळगावात  दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर अखेर त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. या निवडणुकीत त्यांनी महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी सुरेश जैन हे महायुतीला पाठिंबा देतील असे सूतोवाच केले होते. ते खरे ठरले असून विकासाच्या मुद्द्यावर आपण महायुतीसोबत असल्याचे जैन यांनी सांगितले. याआधी ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात सहभागी नसेन, असे म्हटले होते. ते म्हणाले होते की, मी सक्रिय राजकारणाचा संन्यास घेत आहे. वयोमानानुसार आणि प्रकृती अस्वाथ्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. या पुढे जे चांगलं काम करतील त्यांच्या पाठीशी राहणार, मात्र कोणत्याही पक्षात मी सहभागी नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता त्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे.

सुरेश जैन म्हणाले, महायुतीने असं एकही क्षेत्र सोडलेलं नाही की जिथे त्यांच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी होत नाही. ते मला आवडत आहे आणि देशालाही त्याची आवश्यकता आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठी आणि हितासाठी ते काम करत असतील आणि या देशाला २०४७ पर्यंत तिसरी शक्ती बनवण्याचं स्वप्न बाळगत असतील, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण देशाला म्हणजेच शेतकरी असो, आदिवासी असो वा स्त्रिया त्यांना सशक्त बनवण्याची त्यांची जी भूमिका आहे, ती मला आवडली म्हणून मी हा पाठिंबा देत आहे, असं सुरेश जैन म्हणाले. मात्र, मी कोणत्याही पक्षात नसेन, चांगल्या भूमिकेला माझा पाठिंबा असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कार्यकर्त्यांसाठी मी कुठलाही मेळावा घेणार नाही

कार्यकर्त्यांसंदर्भात प्रश्न विचारला असता सुरेश जैन म्हणाले, मी एकेका कार्यकर्त्याला बोलावून माझी भूमिका सांगणार नाही. मी मेळावा घेणार नाही किंवा प्रचारही करणार नाही. प्रेस नोट अथवा मीडियाच्या माध्यमातून जो विचार कार्यकर्त्यांपर्यंत जाईल तो जाईल, असं सुरेश जैन म्हणाले.

Spread the love