पुणे-बनावट कागदपत्रांच्या आधारे एखाद्या आरोपीस न्यायालयात बोगस साक्षीदार उभा करून जामीन मिळवून देणाऱ्या रॅकेटचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून शिवाजीनगर न्यायालयाबाहेर कारवाई करत जामीन मिळवून देणाऱ्या सात जणांना अटक केली.
दिनकर सुंदर कांबळे (३८, रा. चिंचवड, पुणे), गोपाळ पुंडलिक कांगणे (३३, रा. पिंपरी, पुणे), हसन हाजी शेख (२५, रा. पिंपळेगुरव, पुणे), सागर अनंत काटे (२५, रा. पुणे), रोहित विद्यासागर पुटगे (२४) आणि किरण दादाभाऊ सूर्यवंशी (२७, सर्व रा.पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह राकेश परदेशी, रवी वाघमारे, विजय भास्कर या आरोपींविरोधातही गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. मागील वर्षीही पोलिसांनी अशाच प्रकारे बनावट जामीनदार प्रकरणात सुमारे ३० जणांना अटक केली होती. त्यातीलच काही आरोपी पुन्हा फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय, लष्कर न्यायालय, मोरवडी न्यायालय, पिंपरी न्यायालय आदी ठिकाणी येथे हा उद्योग सुरू होता.