मुंबई -:उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन करुन शिंदेंना बाजूला करा, आपण युती करु असा सल्ला दिल्याचे वृत्त मी वाचले. पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते जे तुम्हाला वडिलांसमान मानत आहेत त्यांच्याबद्दल असे बोलत असाल, तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचे काय होत असेल? अशी विचारणा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरेंकडून शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने होत असलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त करत त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे…
यावेळी केसरकर यांनी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केलेल्या फोनच्या प्रकरणाबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, मी मीडियामध्ये बातमी वाचली की उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला होता. तिथे त्यांनी एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवा मी स्वत: तुमच्याबरोबर येतो आणि आपण युती करुया असे म्हटले गेले होते. म्हणजे तुमच्या पक्षामध्ये जे नंबर दोनचे नेते आहेत आणि जे तुमचा आदर करतात तुम्ही त्यांच्याबाबत जर असे करत असाल तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाचे काय होईल? असेही त्यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला हे खरं आहे की खोटं समोर आले पाहिजे. जर हे खोटं असेल तर तुम्ही अनिल परबांचा फोन तपासून पाहा. त्यातून जर फडणवीसांना फोन गेला असेल तर निश्चितपणे हे घडले असेल असे मला वाटते. कारण कधी उद्धव ठाकरेंचे फोन हे त्यांच्या फोनवरुन जात नाहीत. अनिल परबांच्या फोनवरुन जातात. त्यामुळे त्यांचा फोन तपासा मग स्पष्टीकरण द्या, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत. जर शिंदेंना बाजूला करुन युती करायची असेल, तर मग भाजपाला नकार का देत होतात? अशी विचारणाही केसरकरांनी केली आहे.