जळगाव – शहरातील रस्त्यांच्या विषयावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महापालिकेतील विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनी भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सुनील महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार सुरेश भोळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जळगाव शहरातील रस्त्यांमध्ये तसेच जळगाव शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये आमदार सुरेश भोळे यांनी टक्केवारी घेतल्याचा आरोप सुनील महाजन यांनी केला आहे. सुनील महाजन यांच्या या आरोपांमुळे जळगावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधी सुनील महाजन यांच्याकडून आमदार सुरेश भोळे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
“लाडकी बहीण, लाडका भाऊ याप्रमाणे भाजप आमदार सुरेश भोळे यांनी त्यांच्या लाडक्या जावयाला जळगावातील रस्त्यांच्या ठेका मिळून देवून टक्केवारी घेतली आहे. सुरेश भोळे यांनी अशाप्रकारची टक्केवारी घेऊन त्यांनी रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत”, असा थेट आरोप सुनील महाजन यांनी केला आहे. “लाडक्या जावयाचं भलं आणि स्वतःचं भलं व्हावं यासाठीच आमदार सुरेश भोळे यांनी शहरातील रस्त्यांची कामे केली आणि त्या कामांमध्ये टक्केवारी घेतली”, असं सुनील महाजन म्हणाले आहेत.
‘सार्वजनिक बांधकाम विभागावर भव्य मोर्चा काढणार’
“जळगाव शहरात रस्त्यांच्या केलेल्या कामांचे पितळं पावसामुळे उघडं पडलं आहे. राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा जागोजागी खड्डे पडले आहेत. टक्केवारी घेऊन निकृष्ट दर्जाची कामे झाल्यामुळेच रस्त्यांची दुरावस्था झाली आहेत. भाजप आमदार सुरेश भोळे यांनी एकीकडे जळगाव शहरातील रस्त्यांसाठी निधी आणल्याचा मोठेपणा दाखवायचा आणि दुसरीकडे त्याच निधीतून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांमध्ये टक्केवारी घ्यायची हा कुठला न्याय?”, असा सवाल सुनील महाजन यांनी केला. “जळगाव शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सार्वजनिक बांधकाम विभागावर भव्य मोर्चा काढणार”, असा इशारा सुनील महाजन यांनी दिला.