कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात गुरुवार, दि.९ डिसेंबर रोजी संपन्न झाली. अधिसभा सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शासनाचा शिक्षक भरतीचा निर्णय, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग, आश्वासित प्रगती योजना, रोजंदारी कर्मचारींचा प्रश्न, महाविद्यालयांना वेतनेतर अनुदान या विषयांवर चर्चा करुन सर्वानुमते मंजूर झालेले ठराव शासनास पाठविण्यात यावेत असा निर्णय घेण्यात आला.
या सभेत विषय पत्रिकेसह इतर विषयांवर चर्चा झाली. तसेच काही ठराव करुन ते शासनास मंजुरीसाठी पाठविण्यात यावे. ठराव क्र.१ महाराष्ट्र शासन निर्णय क्र. आढावा-१५१३/ प्र.क्र.१२५ (भाग-८)/ मशि-५, दि.१२/११/२०२१ नुसार शासनाने महाविद्यालयीन प्राचार्य, शिक्षकांची पदे भरण्यासाठी २०१७ पर्यंतचा कार्यभार विचारात घेऊन परवानगी दिली आहे. तदनंतर अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे २०२१ पर्यंतचा कार्यभार विचारात घेऊन रिक्त पदे भरती करण्यास तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासही महाविद्यालयांना परवानगी देण्यात यावी. ठराव क्र.२ महाविद्यालयांना शासनाकडून १२ टक्के वेतनेतर अनुदान देण्यात येत होते. ते शासनाने बंद केले आहे. महाविद्यालयांना विकासाकरीता, विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धा, युवारंग, आविष्कार, प्रवास खर्च, इ. कामाकरीता मोठ्या प्रमाणावर निधी लागत असतो. त्याकरीता शासनाने महाविद्यालयांना २० टक्के वेतनेतर अनुदान मंजूर करावे. ठराव क्र. ३-(अ) महाराष्ट्र शासनाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या केवळ १४ पदांना सातवा वेतन लागू केला आहे. उर्वरित ३२ पदांचा शासन निर्णय निर्गमित केलेला नसल्यामुळे विद्यापीठातील ३५० पेक्षा अधिक कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून वंचित राहीले आहे. शासनाने सहाव्या वेतन आयोगाची दि.७ ऑक्टोबर, २००९ च्या अधिसुचने नुसार वेतनश्रेणी आधारभूत मानून त्यानुसार सातवा वेतन आयोगाची अधिसुचना निर्गमित करावी. (ब) शासनाने विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्याचे रद्द केलेले आश्वासित प्रगती येाजनेचे परिपत्रक पुनर्जिवित करावे. पहिल्या लाभाची आश्वासित योजनेचे लाभ देऊन पाठविलेले प्रस्ताव सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालय, जळगाव यांनी मंजूर करुन कर्मचाऱ्यांना लाभ विस्तारित करावे. (क) विद्यापीठात कार्यरत रोजंदारी कर्मचारी यांना सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पुन्हा पाठवावा. तसेच विद्यापीठ पदभरतीचे नियम करतांना रोजंदारी कर्मचारी यांना प्राधान्य देणेबाबतचे नियम शासनास पाठविण्यात यावे. हे ठराव अनुक्रमे प्रा. गौतम कुवर, श्री. नितीन ठाकूर यांनी मांडले यास सर्वानुमते ठराव मंजुर करून शासनास पाठवावे असे ठरले.
अमोल मराठे यांनी युवारंग, रासेयो शिबीर, विद्यार्थी उपक्रम सुरु करावे याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. शासन निर्देशाप्रमाणे कार्यवाही यासंदर्भात करण्यात येईल असे प्रभारी कुलगुरुंनी सांगितले. विष्णु भंगाळे यांनी परीक्षा देयकांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली त्यावर प्रभारी कुलगुरू यांनी चौकशी करणार असल्याचे सांगितले.
सभेच्या सुरुवातीस भारताचे सर सेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत व त्यांची पत्नी यांच्यासह हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यु पावलेल्या १२ लष्करी अधिकाऱ्यांना तसेच बाबासाहेब पुरंदरे, साहित्त्यिक द.मा.मिरासदार, मृत विदयापीठ कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षक, इत्यादींचे दु:खद निधन झालेल्या व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा. ई.वायुनंदन यांना नानाजी देशमुख पुरस्कार, प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार यांना जीवन गौरव पुरस्कार, व्य.प. सदस्य दिलीप रामू पाटील यांना मिळालेल्या मित्तल पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचा ठराव पारित करण्यात आला. डॉ.सतीश पाटील, एकनाथ खडसे, रोहीणी खेवलकर यांची जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेवर संचालकपदी, धुळे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेवर प्रभाकर चव्हाण, सिमाताई रंधे यांची संचालक पदी निवड झाल्याबददल अभिनंदन करण्यात आला तसेच आमदार अमरिषभाई पटेल यांची विधान परिषदेवर निवड झाल्याबदल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.तसेच नवनियुक्त अधिसभा सदस्य प्रदिप कर्पे, पोपट भोळे, महेश घुगरी यांचेही अभिनंदन करण्यात आले.
यासभेत प्रा.गौतम कुवर, नितीन ठाकुर, अमोल मराठे यांनी ठराव मांडले. सभेत या ठरांवासह चर्चेत व्य.प. सदस्य दिलीप पाटील, प्राचार्य एल.पी. देशमुख, प्रा. मोहन पावरा, दिपक पाटील, प्रा. जे.बी. नाईक, प्रा. विवेक लोहार यांच्यासह सिनेट सदस्य प्रा. के.जी. कोल्हे, प्रा. ई.जी. नेहते, प्रा. अनिल पाटील, प्रा. अजय पाटील, प्रा. पी.बी. अहिरराव , प्रा. सुनील गोसावी, प्राचार्य अशोक खैरनार, प्राचार्य ए.टी. पाटील, दिनेश नाईक, अमोल सोनवणे, प्रा.मधुलिका सोनवणे, अॅङ संदीप पाटील, डॉ. सतीश पाटील, प्राचार्य एस. आर. जाधव, जी.वाय. पाटील, गिरीश पाटील, प्रा. मनीष जोशी, मनीषा चौधरी, प्रा. प्रमोद. पवार, इ. अधिसभा सदस्यांनी चर्चेत सहभाग नोंदविला. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी.व्ही. पवार हे उपस्थित होते. प्रभारी कुलसचिव प्रा. आर.एल. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सभा सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.











