जळगाव : महापालिका निवडणुकांसाठी (Election) निष्ठावंत कार्यकर्त्यांची कुचंबणा होत असून अनेकांना ऐनवेळी संधी मिळत नसल्याने दु:ख झाल्याचं पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांनीही दुसरा पर्याय शिल्लक ठेवल्याचं दिसून येत आहे, कारण पक्षाकडून उमेदवारी नाकारली जात असल्याचे लक्षात येताच हे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षातून उमेदवारीसाठी फिल्डींग लावत आहेत. मात्र, निष्ठावंत म्हणून पक्षासोबत राहणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्याने रडू कोसळल्याचंही पाहायला मिळत आहे. जळगावमधील एका महिला उमेदवाराने आज महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरला. मात्र, त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म (तिकीट) न मिळाल्याने त्यांना रडू कोसळल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे पक्षाने तिकीट देऊ केल्याने एका भाजप उमेदवाराने चक्क गुडघ्यावरुन टेकून नेतृत्वाचे आभार मानले आहेत.
जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या कलाबाई शिरसाठ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी दिसताच त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी, कलाबाई शिरसाठ यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. आपण मागासवर्गीय असल्यामुळे जाणीवपूर्वक आपल्या उमेदवारीला कुलभूषण पाटील यांच्याकडून विरोध केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शिवसेना ठाकरे गट प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादीला एकही जागा देण्यास तयार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास आपण अपक्ष म्हणून निवडणूक असल्याचे कलाबाई शिरसाठ यांनी स्पष्ट केले. यासोबतच आंदोलन व उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, जळगाव महापालिकेसाठी महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र ठरले असले तरी अनेक प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून बंडखोरी होण्याची शक्यता या निमित्ताने समोर आली आहे.
काँग्रेसकडून 6 उमेदवारी अर्ज दाखल
जळगाव मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपण एकत्रितरित्या निवडणूक लढविणार असल्याचं जाहीर केले. मात्र, काँग्रेस पक्षाबाबत कोणताही निर्णय जाहीर केला नाही. अद्याप महाविकास आघाडीचा कोणताही निर्णय झाला नसताना, काँग्रेस पक्षाने आज आपले सहा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तिकीट मिळताच गुडघ्यावर बसून मानले नेतृत्वाचे आभार
भाजपकडून आज पुण्यात उमेदवारी भरण्याचा पहिला मान मिळाला तो पुणे महानगरपालिका निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांना. भाजपने आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी यादी जाहीर न करता निश्चित केलेल्या उमेदवारांना फोन करून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे भाजप चे पुणे शहराचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी आज अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार हेमंत रासने उपस्थित होते. फॉर्म भरण्यापूर्वी बिडकर यांच्या कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधलं. बिडकर हे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात फॉर्म भरण्यासाठी आले असता त्याठिकाणी चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी बिडकर यांनी चप्पल काढत थेट गुडघ्यावर बसून चंद्रकांत पाटील यांच्या पायावर डोकं ठेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं.












