पुण्यातील शाईफेक प्रकरणानंतर राज्य सरकारची चांगलीच तंतरली असून विधानभवनात शाई पेनावर बंदी घालण्यात आली आहे. विधिमंडळाच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वारावर पोलिस पेन तपासून बघत होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून पुण्यात समता दलाच्या सैनिकांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर शाईफेक केली होती. त्यानंतर राज्य सरकारने शाईचा धसका घेतला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रवेश करताना अनेकांच्या पेनची तपासणी करण्यात आली. काही जणांच्या खिशात शाईचे पेन आढळले. त्यांची पेन पोलिसांनी जप्त केली. याबाबत प्रसिध्दी माध्यमांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे विचारणा केली तेव्हा सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली. सुरक्षेची जबाबदारी ही पोलिसांची आहे, असे सागितले.