जळगाव -: जिल्ह्यातील अमळनेर मतदारसंघात भाजपच्या माजी आमदाराकडून भाजपच्या महिला खासदारांना धमकवलं जात असल्याच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे .
खासदार स्मिता वाघ या युती धर्म पाळत अमळनेर मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांचा प्रचार करत आहेत. दरम्यान त्यांना धमकी दिली जात असल्याचा आरोप स्मिता वाघ यांनी जाहीर सभेत केला आहे. निवडणुकांपूर्वीच धमक्यांच्या राजकारणामुळे मात्र अमळनेर मध्ये राष्ट्रीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अमळनेर मतदारसंघात भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांनी हा दावा केला आहे. भाजपच्या माजी व सद्यस्थितीत महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून धमकी दिली जात आहे, असा आरोप खासदार स्मिता वाघ यांनी केला आहे. स्मिता वाघ यांनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. आपल्याला जरी धमकावलं जात असलं तरी आपण मेलेल्या आईचे दूध प्यायलेलं नसून धमक्या द्यायच्या असतील तर समोर येऊन धमक्या द्या असं थेट आव्हान खासदार स्मिता वाघ यांनी दिलं आहे.
खासदार स्मिता वाघ यांनी नाव न घेता जरी हे आरोप केले असले तरी त्यांचा रोख हा भाजपचे माजी आमदार व सद्यस्थितीत अपक्ष उमेदवार असलेले शिरीष चौधरी यांच्याकडे आहे. मात्र बहिणींना धमकी देणे हे आमच्या रक्तात नसून स्मिता वाघ यांनी आपल्या मुलाची शपथ घेऊन आम्ही धमकी दिल्याचे सांगितल्यास आजच निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊ असं थेट प्रती आव्हान भाजपचे माजी आमदार व पक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी खासदार स्मिता वाघ यांना दिले आहे.
अमळनेरमध्ये नेमकं काय घडतंय?
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून अनिल पाटील हे उमेदवार होते, तर शिरीष चौधरी हे अपक्ष रिंगणात होते. त्यावेळी शिरीष चौधरी यांनी भाजपाचे उमेदवार अनिल पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला. मात्र या विजयानंतर शिरीष चौधरी यांनी भाजपला पाठिंबा दिला. 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून शिरीष चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली व अनिल पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीकडून अनिल पाटील हे उमेदवार होते. या निवडणुकीत अनिल पाटील यांनी भाजपचे उमेदवार शिरीष चौधरी यांचा 8 हजार 594 मतांनी पराभव करत विजय मिळवला. तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनिल पाटील यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने अनिल पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली.