चाळीसगाव – तालुक्यातील ओढरे येथील महिला सरपंचांना तिसरे अपत्य असल्याच्या कारणावरून केलेल्या तक्रारीची चौकशी सुरू असताना तपासाअंती तीन अपत्य असल्याचे स्पष्ट झाल्याने गटविकास अधिकारी यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.
तालुक्यातील ओढरे येथील महिला सरपंच पुष्पा जगन पवार यांनी आठ महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली. यात त्यांनी दोन अपत्य असल्याचे दाखविले होते. या निवडणुकीत विजय संपादन करून त्या सरपंच पदाच्या पदावर विराजमान झाल्या. दरम्यान सरपंच पुष्पा जगन पवार यांना १२ सप्टेंबर २००१ नंतर तीसरे अपत्य असल्याची माहिती समोर आली आहे.
ओढरे येथील ग्रामस्थ बळीराम दगडू पवार यांनी १ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केलेल्या लिखीत स्वरुपाच्या तक्रारीवरून ही गंभीर बाब उघडकीला आणून कारवाई करण्याची मागणी केली होती. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना पत्राद्वारे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ज- ३) प्रमाणे तातडीने कारवाई करण्याचे निर्देशन दिलेले होते.