तो पुन्हा आला! महाराष्ट्रात Alert! कोरोनापासून लस करणार का रक्षण? पुनावालांनी दिली महत्त्वाची माहिती

0
14

मुंबई – संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने आता पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. जागतिक स्तरावर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने पुन्हा एकदा लोकांवर घरातच बंद राहण्याची वेळ येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने आता आधीच योग्य ती पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतीय केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली सध्या कोरोनाव्हायरस आढावा बैठकी सुरू असून सगळ्यांचंच या बैठकीकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान, भारतातील कोरोना स्थितीबाबत बोलताना आदर पुनावाला यांनी दिलासादायक माहिती दिली आहे.

पुनावाला म्हणाले, की ‘भारतात उत्कृष्ट व्हॅक्स कव्हरेज आहे. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही’. मात्र याचवेळी महाराष्ट्र अलर्टवर असल्याने राज्यातील नागरिकांना मात्र विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

एअरफिनिटीच्या विश्लेषणानुसार, ‘चीनच्या लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्तीची पातळी खूपच कमी आहे. तेथील नागरिकांना चीनमध्ये बनवलेल्या लसी, सिनोव्हॅक आणि सिनोफार्म देण्यात आल्या, ज्या अतिशय कमी प्रभावी ठरल्या आहेत. या लसी कोरोना संसर्ग आणि मृत्यूपासून फारच कमी संरक्षण देतात. मात्र भारतातील लसी उत्कृष्ट आणि प्रभावी असल्याचं पुनावाला यांचं म्हणणं आहे.

त्यामुळे ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे राज्यातील स्थितीबाबत बोलताना महाराष्ट्र आरोग्य सचिवांनी म्हटलं की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार, आम्ही जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सर्व नमुने पुणे आणि मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवू. सध्या आमच्याकडे राज्यात दररोज सुमारे 100 पॉझिटिव्ह केसेस आढळत आहेत, म्हणून आम्ही सर्व पॉझिटिव्ह नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगसाठी जाऊ.

दरम्यान, देशातील रेल्वे स्थानके आणि विमानतळांवरही रँडम कोविड चाचणीची तयारी तीव्र झाली आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात अशी कोणतीही योजना नाही. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, महाराष्ट्राचे आरोग्य सचिव संजय खंदारे यांनी सांगितले की, रेल्वे स्टेशन, विमानतळ इत्यादींवर रँडम कोविड चाचणी सुरू करण्याच्या मुद्द्यावर अद्याप आमची कोणतीही योजना नाही. याबाबत केंद्र सरकारच्या पुढील निर्देशांची आम्ही वाट पाहत आहोत.

 

Spread the love