आज 19 फेब्रुवारी तारखेनुसार शिवजयंती.

0
50

शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा…म्हणजे शिवाजी महाराज.

हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या दांपत्यापोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला. विश्वसनीय साधनांवरून फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख बहुतेक इतिहाससंशोधकांनी आणि आता महाराष्ट्र शासनानेही निश्चित केली आहे.
मालोजी हे या घराण्यातील पहिले कर्तबगार पुरुष. त्यांना शहाजी व शरीफजी असे दोन मुलगे होते. मालोजी हे निजामशाहीतील एक कर्तबगार सरदार होते. मालोजी व त्यांचे बंधू विठोजी यांच्याकडे औरंगाबादजवळचे वेरुळ, कन्नड व देऱ्हाडी (देरडा) हे परगणे मुकासा (जहागीर) म्हणून होते. शहाजी पाच वर्षांचे असताना मालोजी मरण पावले. त्यांच्या नावाची जहागीर शहाजींच्या नावाने राहिली. निजामशाहीतील दरबारी कारस्थानात शहाजींचे सासरे लखूजी जाधव मारले गेले (१६२९). त्यामुळे नाराज होऊन त्यांनी निजामशाहीची नोकरी सोडली. त्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा संभाजी यांचा विवाह शिवनेरीचा किल्लेदार विश्वासराव यांच्या मुलीशी झाला होता. त्या निमित्ताने शहाजींनी जिजाबाईस शिवनेरीवर ठेवले होते. विजापूर सोडून गेल्यामुळे मुहंमद आदिलशहा (कार. १६२७–५६) हा शहाजींवर रुष्ट झाला होता. आदिलशाही विरुध्द गेलेली आणि लखुजींच्या मृत्युमुळे निजामशाही सुटलेली अशा अवस्थेत शहाजींना परागंदा होण्याची वेळ आली. अखेर आदिलशहाच्या बोलावण्यावरून ते १६३६ मध्ये त्याच्या नोकरीत शिरले. आदिलशहाने त्यांच्याकडे पुण्याची जहागीर बहाल केली व मोठा हुद्दा देऊन कर्नाटकाच्या मोहिमेवर पाठविले. विजापूरच्या सैन्याने १६३८ च्या अखेरीस बंगलोर काबीज केले. तेव्हा बंगलोर, कोलार इ. प्रदेशांची जहागीर शहाजींना मिळाली आणि ते बंगलोर येथे कायमचे राहू लागले.
शिवाजी महाराजांचे बालपण शिवनेरी, माहुली (ठाणे जिल्हा) व पुणे येथे गेलेले दिसते. बंगलोरलाही ते काही काळ राहिले. शिवाजी आणि जिजाबाई यांच्याकडे महाराष्ट्रातील जहागिरीची व्यवस्था सोपवून शहाजीराजांनी त्यांची पुण्याला रवानगी केली. जहागिरीची प्रत्यक्ष व्यवस्था पाहण्यासाठी शहाजींनी दादोजी तथा दादाजी कोंडदेव आणि आपले काही विश्वासू सरदार यांची नेमणूक केली. जिजाबाईंचा देशाभिमान, करारीपणा आणि कठीण प्रसंगांतून निभाऊन जाण्यासाठी लागणारे धैर्य, या त्यांच्या गुणांच्या तालमीत शिवाजीराजे तयार झाले. दादोजी कोंडदेव यांच्या मृत्युनंतर (१६४६-४७) शिवाजीराजांनी प्रत्यक्ष कारभार हाती घेतला. त्यांनी गड आणि किल्ले आपल्या ताब्यात घेण्यासाठी अनेक मोहिमा आखून यशस्वी रीत्या पार पाडल्या. देशमुख, देशपांडे, वतनदार इत्यादींशी त्यांनी निरनिराळ्या प्रकारे संबंध जोडले. शिवाजी महाराजांना आठ पत्नी असल्याचे उल्लेख मिळतात. त्यांपैकी सईबाई (निंबाळकर) हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला. त्यानंतर सोयराबाई (मोहिते), पुतळाबाई (पालकर), सकवारबाई (गायकवाड), काशीबाई (जाधव) व सगुणाबाई (शिर्के) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. यांशिवाय इंगळे व आणखी एका घरण्यातील मुलीबरोबरही त्यांचा विवाहसंबंध झाला. महाराजांना सईबाईपासून संभाजी (१६५७ –८९) व सोयराबाईपासून राजाराम (१६७०–१७००) असे दोन मुलगे झाले. याशिवाय त्यांना सहा कन्याही होत्या. सईबाई १६५९ मध्ये मरण पावल्या आणि काशीबाई राज्याभिषेकापूर्वी मरण पावल्या (१६७४). पुतळाबाई महाराजांबरोबर सती गेल्या. सोयराबाई संभाजींच्या कारकीर्दीत १६८१ मध्ये आणि सकवारबाई शाहूंच्या कारकीर्दीत मरण पावल्या. महाराजांनी पुण्याच्या परिसरातील मोकळ्या टेकड्या, पडके किल्ले, दुर्गम स्थळे हळूहळू आपल्या ताब्यात आणली. राजगड आणि तोरणा किल्ला (प्रचंडगड) महाराजांनी हस्तगत केला.जी स्थळे आपण घेतली, ती विजापूर राज्यातील सुरक्षितता कायम रहावी या हेतूनेच, अशी भूमिका महाराजांनी घेतली. विजापूर दरबारनेही सुरुवातीस महाराजांच्या या चळवळीकडे फारसे लक्ष दिले नाही; पण महाराजांनी कोंडाण्याच्या (सिंहगडच्या) किल्लेदाराला आपलेसे करून तो आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी मुहंमद आदिलशहाचे डोळे उघडले. महाराजांच्या विरुध्द विजापूरचे सैन्य चालून गेले. दक्षिणेत विजापूरच्या सैन्यात शहाजीराजे हे अधिकारी म्हणून जिंजीच्या किल्ल्यासमोर तळ देऊन होते. त्यांच्यावर फितुरीचा आरोप ठेवण्यात येऊन त्यांना कैद करण्यात आले (१६४८) आणि त्यांना विजापूरला आणण्यात आले. या काळात पुरंदरच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी निकराचा लढा देऊन विजापूरचे सैन्य उधळून लावले (१६४८ अखेर). सैन्याची इतर भागांतील आक्रमणेही परतवण्यात आली. शहाजी राजांना काय शिक्षा होईल, याची काळजी महाराज आणि जिजाबाई यांना पडली. त्यावेळी दक्षिणेचा मोगल सुभेदार म्हणून शाहजहानचा मुलगा मुरादबख्श हा औरंगाबाद येथे कारभार पहात होता. त्याच्याशी संपर्क साधण्याचा आणि त्याच्या मार्फत विजापूरवर दडपण आणण्याचा प्रयत्न महाराजांनी केला. कोंडाण्याचा किल्ला परत द्यावा, ही अट आदिलशहाने घातली. किल्ला परत देण्यास महाराज नाखूष होते; तथापि सोनोपंत डबीर याने शिवाजी महाराजांची समजूत घातली. सिंहगडचा किल्ला आदिलशहाकडे परत करण्यात आला. त्यानंतर शहाजींची सुटका होऊन (१६४९) त्यांची बंगलोरला सन्मानाने रवानगी करण्यात आली.
पुढील सहा वर्षांत शिवाजी महाराजांनी जहागिरीचा सगळा बंदोबस्त आपल्याकडे घेतला. पुणे, सुपे, इंदापूर, चाकण ही या जहागिरीतील प्रमुख स्थळे. १६५४ च्या सुमारास महाराजांनी पुरंदरचा किल्ला महादजी नीळकंठराव किल्लेदार याच्या मुलांकडून हस्तगत केला आणि पुणे प्रांताची सुरक्षितता मजबूत केली.पुढे महाराजांनी जावळीवर स्वारी केली. सहा महिन्यांच्या या मोहिमेत चंद्रराव मोरे आणि त्यांचे भाऊबंद मारले गेले आणि जावळीचा मुलूख त्यातील रायरीच्या किल्ल्यासकट महाराजांच्या ताब्यात आला (१६५६). विजापूरहून कोकणपट्टीकडे जाणाऱ्या मार्गावरील ही महत्त्वाची ठिकाणे. जावळी खोरे ताब्यात आल्याबरोबर महाराजांनी मोरो त्रिंबक पिंगळे यास प्रतापगड किल्ला बांधून घेण्यास आज्ञा दिली (१६५६). मुहंमद आदिलशहाच्या मृत्युनंतर (४ नोव्हेंबर १६५६) त्याचा मुलगा दुसरा अली आदिलशहा गादीवर आला. तो औरस पुत्र नाही किंवा त्याचे कुल अज्ञात आहे, अशी सबब पुढे करून मोगलांच्या सैन्याने विजापूरच्या ईशान्येकडील कल्याणी आणि बीदर ही स्थळे काबीज केली (१६५७). शिवाजी महाराजांनीही मोगलांचे जुन्नर शहर लुटले आणि अहमदनगरच्या पेठेवर हल्ला केला. ही धावपळीची लढाई चालू असतानाच महाराजांनी औरंगजेबाशी संपर्क ठेवला होता. विजापुरातील बदलती परिस्थिती लक्षात घेऊन कोकणात आपल्या पदरात काय पडेल, ते मोगलांकडून मिळवावे, असा विचार महाराजांनी केला होता. विजापूरशी लवकर तह करावा, अशी मोगल बादशहा शाहजहानने आज्ञा केली.
१६५७ मध्ये मोगलांनी घेतलेले बीदर, कल्याणी हे प्रदेश आपल्याकडे ठेवून घ्यावेत, मागच्या तहात मोगलांनी दिलेले कल्याण, भिवंडी आणि पुणे प्रांत हे विजापूरने परत करावेत, शिवाय खंडणी देत जावी, या अटींवर हे युद्ध संपले. या सुमारास शाहजहान हा अतिशय आजारी पडला (१६५७). हे वृत्त विजापूरलाही कळले होते. त्यामुळे विजापूरने हा तह संपूर्णपणे पाळण्यास टाळाटाळ केली. शाहजहानचा आजार आणि औरंगजेबाचे उत्तरेकडे लागलेले लक्ष, हे पाहून महाराजांनी सरळ कल्याण व भिवंडी ही स्थळे हस्तगत केली (२४ ऑक्टोबर १६५७).
याच सुमारास, आम्हाला परत केलेल्या कल्याण, भिवंडी आणि पुणे प्रांतातून शिवाजीला हाकलून लावा, असे दडपण मोगलांकडून विजापूरवर येऊ लागले. विजापूर दरबारने शिवाजी महाराजांविरुध्द अफझलखानाची रवानगी केली. इ.स. १६४९ पासून वाई परगणा अफझलखानाकडे मुकासा (जहागीर) म्हणून होता. त्यामुळे त्याला या प्रदेशाची माहिती होती. अफझलखान हा विजापूरहून एप्रिल १६५९ मध्ये निघाला आणि वाईस पोहोचला. वाटेत त्याने धमकी व दहशतीचे वातावरण पसरून दिले. वाईला आल्यानंतर अफझलखानाने पुणे, कल्याण आणि भिवंडी प्रांतांचा ताबा घेण्यासाठी वरील मराठी सरदार आणि सिद्दी हिलाल यांना त्या प्रांतांत पाठवून दिले. त्या प्रांतांतील मराठे वतनदार, देशमुख, देशपांडे इत्यादींना महाराजांच्या विरुध्द उठविण्याचाही अफझलखानाने प्रयत्न केला. महाराज या अडचणीत असतानाच सईबाई वारल्या (१६५९); तथापि ते विचलित झाले नाहीत. त्यांनी आपला तळ प्रतापगडसारख्या दुर्गम स्थळी ठेवला आणि अफझलखानाचा प्रतिकार करण्याची भक्कम तयारी केली. महाराजांनी खानाला प्रतापगडाकडे आणण्यासाठी मोठ्या मुत्सद्दीपणाने त्याला कळविले, की “आपण प्रतापी, आपला पराक्रम थोर, आपण माझ्या वडिलांचे ऋणानुबंधी; त्यामुळे आपणही माझे हितचिंतक आहात. आपल्या तळावर येऊन आपल्याला भेटणे हे सध्याच्या वातावरणात मला सुरक्षितपणाचे वाटत नाही. उलट आपण प्रतापगडास यावे. माझा पाहुणचार स्वीकारावा. मी आपले सर्व काही, माझा खंजीरसुद्धा आपल्यापाशी ठेवून देईन.” महाराजांचा हा डावपेच अफझलखानाला कळला नाही. युद्धावाचूनच शिवाजी आपल्या हातात येणार, या भ्रमात तो राहिला. प्रत्यक्षात महाराजांना कैद करून अगर ठार मारून ही मोहीम निकालात काढावी, असा त्याचा हेतू होता. प्रतागडाजवळ ठरलेल्या स्थळी शामियाने उभारून उभयतांच्या भेटी व्हाव्यात असे ठरले. १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची भेट झाली. महाराजांच्या शरीरक्षकांत गायकवाड, सिद्दी इब्राहीम, जिवाजी महाले (सकपाळ) इ. मंडळी होती, तर अफझलखानाच्या शरीररक्षकांत सय्यद बंडा, शंकराजी मोहिते, पिलाजी मोहिते इ. मंडळी होती. महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ तर खानातर्फे कृष्णाजी भास्कर हेही बरोबर होते. भेटीपूर्वी दोघांनीही आपल्या तलवारी रक्षकांच्या हाती दिल्या होत्या. दोघांपाशी खंजीरी होत्या. अफझलखानाने शिवाजी महाराजांना घट्ट आलिंगन दिले. शत्रू हाती आला आहे, त्याचा निकाल लावावा असे खानाला वाटले असावे. त्याक्षणी महाराजांनी वाघनख त्याच्या पोटात खुपसले आणि त्याच्या मिठीतून सुटका करून घेतली आणि नंतर कट्यारीने वार केला. भेटीपूर्वी ठरल्याप्रमाणे महाराजांनी पुढील हालचालींसाठी सैन्याला इशारा दिला. त्यांनी अफझलखाच्या बेसावध सैन्यावर चाल केली. त्यावेळी झालेल्या युद्धात खानाच्या सैन्याची लांडगेतोड झाली. महाराजांना या युद्धात हत्ती, घोडे, उंट, मूल्यवान वस्त्रे, अलंकार इ. संपत्तीची मोठी लूट प्राप्त झाली. अफझलखानाच्या मृत्यूने सगळा दक्षिण भारत हादरून गेला.
अफझलखानाच्या मृत्यूनंतर विजापूर राज्यात उडालेल्या गोंधळाचा महाराजांनी पुरेपूर फायदा घेतला. त्यांच्या सैन्याच्या एका तुकडीने कोकणात राजापूर, वेंगुर्ल्यापर्यंत धडक मारली, तर दुसऱ्या तुकडीने घाटावर कोल्हापुरापर्यंत आक्रमण केले. नोव्हेंबर १६५९ च्या अखेरीस पन्हाळगडचा दुर्गम किल्ला महाराजांच्या हातात आला. अशा परिस्थितीत विजापूर दरबार स्वस्थ बसून राहणे शक्य नव्हते. पन्हाळगड परत जिंकून घेण्याच्या उद्देशाने सिद्दी जौहरच्या नेतृत्वाखाली विजापूरहून प्रबळ सैन्य चालून आले आणि त्याने पन्हाळागडाला वेढा घातला. यावेळी आदिलशहाने मोगलांची मदत मागितली. शायिस्तेखान हा जानेवारी १६६० मध्ये औरंगाबादेस पोहचला. शायिस्तेखानाच्या पत्रांवरून मोगल आणि विजापूर हे दोघे परस्परांशी किती एकमताने वागत होते, याची कल्पना येते. शायिस्तेखानाने पुण्यातच तळ ठोकला. पुढील तीन वर्षे तो औरंगाबादेच्या ऐवजी पुण्याहूनच सुभ्याचा कारभार पाहत होता. इकडे महाराज पन्हाळ्यात राहून वेढा लढवीत असता शायिस्तेखानाने उत्तरेकडे कूच करून चाकणच्या गढीला वेढा घातला. मराठे मोगलांशी निकराने लढत होते. किल्लेदार फिरंगोजी नरसाळे याने चाकणचा किल्ला शर्थीने लढविला.
तीन महिन्यांच्या या वेढ्यात मोगलांचे सहाशेच्यावर सैनिक जखमी वा मृत झाले. शेवटी तो किल्ला मोगलांच्या ताब्यात आला. मराठ्यांना मोगल आणि आदिलशहा या दोन शत्रूंशी एकाच वेळी लढावे लागत आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सिद्दी जौहरशी वरपांगी सलोख्याचे बोलणे करून मोजक्या लोकांनिशी रात्री पन्हाळगड सोडला (१३ जुलै १६६०) आणि विशाळगडाकडे कूच केले. विजापूरच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी गजापूरच्या खिंडीत सैन्याचा निकराने प्रतिकार करीत असता बाजीप्रभू देशपांडे हे जखमी होऊन मरण पावले. महाराज विशाळगडास पोहचले आणि तेथून राजगडास गेले. सिद्दी जौहरने शिवाजी महाराजांना पन्हाळगडातून जाऊ दिले, असा संशय अली आदिलशहाला आला. आपल्यावर हा नाहक ठपका ठेवण्यात आला, याचे वैषम्य वाटून सिद्दी जौहरने अली आदिलशहाच्या विरुद्ध बंड केले. अली आदिलशहाच्या वतीने जौहरने पन्हाळागडाला वेढा घातला, तेव्हा महाराजांनी पन्हाळगड मुत्सद्देगिरीने सोडून दिला. चाकणच्या वेढ्यात आपली मोठी हानी झाली, हे पाहून शायिस्तेखानाने महाराजांच्या किल्ल्यांवर हल्ले करण्याचा नाद सोडला व मोगल सैन्य मैदानी प्रदेशांत पसरले आणि पुणे, कल्याण आणि भिवंडी हे मुलूख त्यांनी काबीज केले. मोगलांनी १६६१ च्या प्रारंभी लोणावळ्याजवळून कोकणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण मोगल सेनापती कारतलबखान यास उंबरखिंडीत गाठून महाराजांनी त्याला शरण येण्यास भाग पाडले. उंबरखिंडीचे युद्ध (१६६१) हे शिवाजी महाराजांच्या गनिमी युद्धतंत्राचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण होय. नंतर मोगल आणि मराठे यांच्यात किरकोळ चकमकी झाल्या. शायिस्तेखान पुण्यास मोठे सैन्य घेऊन ठाण मांडून बसलेला होता. अखेर शिवाजी महाराजांनी शायिस्तेखानाचा समाचार घेण्याची एक धाडसी योजना आखली. ही योजना म्हणजे मोठ्या सैन्याने वेढलेल्या व शायिस्तेखान असलेल्या पुण्यातील लाल महालावर हल्ला करणे, ही होय. शायिस्तेखानाचा दुय्यम सेनापती जोधपूरचा राजा जसवंतसिंह हा होता. ५ एप्रिल १६६३ च्या रात्री महाराज निवडक सशस्त्र सहकाऱ्यांसह शायिस्तेखानाच्या लष्करात घुसले, किरकोळ चकमकीनंतर त्यांनी शायिस्तेखानाला महालात गाठले. शायिस्तेखान पळून जाण्याचा प्रयत्नात असता, त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राचे वार होऊन त्याला आपली बोटे गमवावी लागली.
शिवाजी महाराजांच्या अंमलाखाली सामान्यपणे पुणे जिल्हा, मध्य आणि दक्षिण कोकण आणि सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका व प्रतापगड हे प्रदेश होते. मोगल महाराष्ट्रात सर्वत्र पसरलेले होते. त्यांना जबर धक्का द्यावा म्हणून शिवाजी महाराजांनी आणखी एक सुरत लुटीचा धाडसी उपक्रम योजला. महाराजांनी कल्याण, भिवंडी, डांग या भागांतून पोर्तुगीज हद्दीच्या बाजू-बाजूने सरकत सुरत गाठले. मराठे सुरतेच्या अगदी जवळ येईपर्यंत मोगल अधिकाऱ्याना त्यांचा पत्ता लागला नाही, हल्ला होताच तेथील मोगल अधिकारी किल्ल्यात जाऊन बसला, तो शेवटपर्यंत बाहेर आलाच नाही. चार दिवस मराठ्यांनी सुरतेची लूट केली (६ ते ९ जानेवारी १६६४). मोगलांचा सगळा प्रतिकार त्यांनी हाणून पाडला. संपत्ती घेऊन ते सुरक्षितपणे स्वराज्यात परतले. या स्वारीनंतर शहाजीराजे कर्नाटकात शिकार करताना घोड्यावरून पडून होदिगेरे येथे २३ जानेवारी १६६४ रोजी मरण पावले.
सुरतेहून आणलेल्या लुटीतून त्यांनी दक्षिण कोकणातील सिंधूदुर्ग बांधला आणि मराठा आरमाराचा विस्तार केला. याची सुरवात त्यांनी कल्याण-भिवंडी घेऊन यापूर्वीच सुरू केली होती (१६५७). पश्चिम किनाऱ्याचे रक्षण आणि आरमाराला सुरक्षितता या हेतूने शिवाजी महाराजांनी ठिकठिकाणी जलदुर्ग बांधले.
औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. महाराजांनी जयसिंहाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण शरणागती पत्करल्याशिवाय बोलणे नाही, ही भूमिका त्याने घेतली. मोगलांनी निकराचा हल्ला करून पुरंदरजवळचा रुद्रमाळचा किल्ला ताब्यात घेतला (१४ एप्रिल १६६५). तो जाऊ देऊ नये आणि पुरंदर हाती यावा अशी त्यांची योजना होती. दिलेरखान सासवड येथे ठाण मांडून राहिला. मोगलांनी बुरुजांच्या उंचीचे दमदमे तयार केले (३० मे १६६५). त्यांवर तोफा चढवून किल्ल्यावर मारा करण्याचा त्यांचा हेतू होता. मराठे व मोगल यांच्या रोज चकमकी झडत. महाराजांनी किल्ल्यात मदत पाठविण्याचे प्रयत्न केले; पण ते पुरंदरच्या शिबंदीला कमी पडत होते. मोगल शेवटी पुरंदर घेणार अशी चिन्हे दिसू लागली. शिवाय जयसिंहाने प्रबळ लष्करी पथके मराठ्यांच्या मुलखात पाठवून तो बेचिराख करण्याचे सत्र सुरू केले. पुरंदरच्या युद्धात मुरारबाजी देशपांडेसारखा पराक्रमी सेनापती कामी आला. तेव्हा शिवाजी महाराजांनी एकदंर परिस्थितीचा विचार करून शेवटी चाणाक्षपणे व दूरदृष्टीने तह करण्याचे ठरविले. त्यांचा हेतू राज्य आणि शक्य तितके किल्ले वाचवावे, हा होता. ११ जून १६६५ रोजी शिवाजी महाराजांनी जयसिंहाची भेट घेतली. संपूर्ण शरणागती पत्करून मिळेल त्यावर समाधान मानावे, ही जयसिंहाची मागणी. कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवावे, हा महाराजांचा हेतू. अखेर पुरंदरच्या तहाच्या वाटाघाटी होऊन अटी ठरल्या. मात्र पुरंदरच्या अटींनी औरंगजेब संतुष्ट झाला नाही; कारण जयसिंहाने शिवाजीचा नाश करण्याची संधी घालविली, असे त्याचे मत होते. तहातील अटींनुसार मोगलांनी पुणे, कल्याण आणि भिवंडी हे प्रांत शिवाजी महाराजांकडून घेतले. त्याचे महाराजांना मनस्वी दुःख झाले; पण कोकणातील आणि घाटावरील काही किल्ले व प्रदेश महाराजांनी टिकवून ठेवण्यात यश मिळविले.
विजापूरच्या मोहिमेत जयसिंहाची फजिती झाली होती. तेव्हा शिवाजी महाराज विजापूरशी युती करतील, अशी शंका जयसिंहाला आली. शिवाजीला औरंगजेबाने आग्र्यास बोलावून घ्यावे, असे त्याने बादशहास सुचविले. त्याप्रमाणे औरंगजेबाचा हुकूम आला. आग्र्याला जाण्यास ते राजी नव्हते; पण जयसिंहाने त्यांची समजूत घातली आणि पुरंदरच्या तहातील काही अटी सैल होऊ शकतील, असे सूचित केले. शिवाय मुलगा रामसिंह तुमच्या सुरक्षिततेची आग्र्यामध्ये पूर्ण काळजी घेईल, अशीही हमी जयसिंहाने दिली. आग्र्याला जाऊन बादशाहाची भेट घ्यावी, असे महाराजांनी ठरविले. मोजका सरंजाम आणि संभाजी यास घेऊन महाराज आग्र्यास जाण्यास निघाले (५ मार्च १६६६).
महाराज १२ मे १६६६ रोजी दुपारी आग्र्यास पोहोचले. रामसिंहाने त्यांचे स्वागत केले. रामसिंहाचा तळ त्यावेळी खोजा फिरोजखान याची कबर असलेल्या बागेत होता. ही जागा ग्वाल्हेर-आग्रा रस्त्यावर आग्र्याच्या किल्ल्यापासून सु. अडीच किमी. अंतरावर आहे. रामसिंहाने आपल्या तळाशेजारीच त्यांना राहण्यास जागा दिली. पुढील सु. तीन महिने त्यांचे वास्तव्य येथेच होते. महाराज पोहोचताच त्यांना आपल्या भेटीस आणावे, अशी औरंगजेबाने आज्ञा केली होती. त्यावेळी बादशहाच्या वाढदिवसानिमित्त भरविलेला दरबार संपला होता व औरंगजेब मोजक्या अधिकाऱ्यांसह दिवाण-इ-खासमध्ये बसला होता. या ठिकाणी रामसिंह शिवाजी महाराजांसह गेला. महाराज आणि संभाजी यांनी दरबारी पध्दतीप्रमाणे मोहरा आणि रुपये नजर केले. औरंगजेब स्वागताचा एकही शब्द बोलला नाही. त्यांना दरबारी अधिकाऱ्याच्या रांगेत अयोग्य जागी उभे करण्यात आले. आपला अपमान झाला, ह्या विचाराने शिवाजी महाराजांचा क्षोभ अनावर झाला. औरंगजेबाने रामसिंहाला विचारले शिवाजीला काय होत आहे? रामसिंह जवळ येताच शिवाजी महाराज कडाडून म्हणाले, “ मी कोणच्या प्रकारचा मनुष्य आहे, हे तुला, तुझ्या बापाला आणि बादशहाला ठाऊक आहे. असे असूनही मला अयोग्य ठिकाणी उभे करण्यात आले. मला बादशाही मनसब नको, चाकरी नको”, असे मोठ्याने म्हणतच महाराज जाऊ लागले. रामसिंहाने त्यांना थांबवण्याकरिता त्यांचा हात धरला, तो झिडकारून महाराज एका बाजूला जाऊन बसले. त्यांना खिल्अत (सन्मानाचा पोशाख) देण्यास औरंगजेबाने आकिलखान, मुख्लिसखान, मुल्तफतखान यांना पाठविले. औरंगजेबाच्या आज्ञेने महाराजांच्या तळाभोवती चौकी पहारे बसविण्यात आले.
पुढील तीन महिने महाराजांचे वास्तव्य आग्र्यात होते. हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रसंग होता, असेच म्हणावे लागेल. औरंगजेबाने दगाफटका करावा, ठार मारावे वगैरे विचार व्यक्त केले; पण प्रत्येक वेळी अनपेक्षित घडत गेले आणि शिवाजी महाराजांवरील संकट टळत गेले. महाराजांना शहरातील दुसऱ्या एका हवेलीत हलविण्याचा बेत आखण्यात आला. तत्पूर्वीच निघून जाण्याचे महाराजांनी ठरविले.
१७ ऑगस्ट १६६६ रोजी संध्याकाळी शिवाजी महाराज पेटाऱ्यातून निसटले. महाराज कैदेतून पळून गेल्याचे पहारेकऱ्यांना दुसऱ्यां दिवशी समजले. औरंगजेबाला ही बातमी ताबडतोब कळविण्यात आली. रामसिंह, फौलादखान, तरबियतखान इत्यादींना तपासासाठी कडक आज्ञा देण्यात आल्या. आग्र्यात अनेक लोकांची धरपकड करण्यात आली. औरंगजेबाचा मोठा संशय रामसिंहावर होता; पण आरोप सिध्द झाला नाही. अंबरची जहागीरही त्याला देण्यात आली. औरंगजेबाने अधिकाऱ्यांना काही शिक्षा केली नाही. पुढे शिवाजी महाराज सुरक्षितपणे राजगडला पोहोचले (२० नोव्हेंबर १६६६). नंतर काही महिन्यांनी संभाजींना राजगडाला सुरक्षितपणे आणण्यात आले. पोहोचल्यानंतर त्यांनी या गोष्टीचा फार गवगवा केला नाही. उलट वरकरणी आपण मोगलांशी एकनिष्ठ आहोत, असे दाखविले व बादशहाचा निरोपही घेता आला नाही, अशी दिलगिरी व्यक्त केली. शिवाजी महाराजांचा आपल्या मुलाला उपसर्ग होऊ नये, यासाठी औरंगजेबानेही सबुरीचे धोरण ठेवले. राजगडास पोहोचल्यानंतर महाराजांनी शहाजादा मुअज्जम यास पत्र लिहून संभाजीला दिलेली मनसब व जहागीर मिळावी, म्हणजे आपण त्याच्याबरोबर पथके देऊन सुभेदाराच्या चाकरीसाठी त्याला औरंगाबादेस पाठवू असे कळविले आणि सरदारांसहित संभाजी औरंगाबादेस गेले. तिथे संभाजी काही दिवस राहिले व पथके आणि सरदार यांना औरंगाबादेस ठेवून राजगडास परतले. त्यांना मनसब व जहागीर आणि शिवाजी महाराजांना ‘राजा’ ही पदवी या घटना १६६७ मधील होत.
महाराजांच्या आग्रा भेटीचा फायदा घेऊन आदिलशहाने कोकणात पुन्हा आक्रमण केले. शिवाजी महाराजांनी फोंडा किल्ला आणि इतर काही महाल वगळता मध्य व दक्षिण कोकण हे प्रदेश पुन्हा ताब्यात घेतले आणि सावंतवाडीच्या बंडखोर देसायांना आपल्या हवाली करावे, असे पोर्तुगीजांना सांगितले. पोर्तुगीजांच्या गोव्याच्या मुलखातील बारदेशावर तीन दिवस स्वारी केली (१० ते १२ नोव्हेंबर १६६७). पेडणे, कुडाळ, डिचोली इ. भागांतील बंडखोर देसायांना पकडावे, असा त्यांचा उद्देश होता; पण ते लोक गोव्याला पळून गेले. या स्वारीत पोर्तुगीजांचे नुकसान व मनुष्यहानी झाली. अखेर थोड्या दिवसांनी १६६७ मध्ये दोन्ही पक्षांत तह झाला. तहाप्रमाणे मराठ्यांनी कैदी आणि मालमत्ता परत केली. पोर्तुगीजांनीही बंडखोर देसायांना आवर घालू अशी हमी दिली. दाभोळला पोर्तुगीजांना वखार उघडण्यास शिवाजी महाराजांनी परवानगी दिली. पुढे नारवे येथील सप्तकोटीश्वर देवालयाचा त्यांनी जीर्णोद्धार केला (१६६८). याच वर्षी फ्रेंचांनाही राजापूर येथे वखार घालण्यास त्यांनी परवानगी दिली. सिद्दीचा निकाल लावण्यासाठी मराठ्यांनी एप्रिल १६६९ मध्ये जंजिऱ्याला वेढा दिला.
जंजिरा शिवाजी महाराजांच्या हाती जाणे मोगल, पोर्तुगीज आणि इंग्रज यांपैकी कुणालाच नको होते. ते सिद्दीला गुप्तपणे मदत करीत. या निमित्ताने सिद्दींना मदत करून मध्य कोकणात प्रवेश करावा, ही मोगलांची इच्छा होती. त्यामुळे शिवाजी महाराजांचा हा प्रयत्न असफल झाला; तथापि मोगलांवरच चढाई करण्याची धाडसी मोहीम महाराजांनी आखली (१६६९). शिवाजी महाराजांनी मोगलांना दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली. तानाजीने केलेला सिंहगडावरील अचानक हल्ला त्याच्या हौतात्म्यामुळे अविस्मरणीय ठरला (४ फेब्रुवारी १६७०). या लढाईत तानाजी आणि राजपूत किल्लेदार उदेभान हे दोघेही ठार झाले. पुढील सहा महिन्यांत मराठ्यांनी पुरंदर, रोहिडा, लोहगड, माहुली (शहापूरजवळ) इ. किल्ले घेतले. पुरंदरचा किल्लेदार रजीउद्दीन हा मराठ्यांच्या ताब्यात आला (८ मार्च १६७०). मराठ्यांनी चांदवड लुटले आणि मोगल खजिना हस्तगत केला. हत्ती व घोडे ही लूटही त्यावेळी त्यांना मिळाली. माहुलीच्या किल्ल्यावरील मराठ्यांचा पहिला हल्ला किल्लेदार मनोहरदास याच्या दक्षतेमुळे फसला; पण दुसऱ्या हल्ल्यात (जून १६७०) मराठ्यांनी किल्लेदार अल्लाहवीर्दीखान याला ठार मारून किल्ला ताब्यात घेतला. माहुलीवरील पहिल्या हल्ल्यानंतर महाराजांनी कल्याण, भिवंडीवर हल्ला चढविला. तेथे निकराचा लढा होऊन कल्याण-भिवंडीचा प्रदेश महाराजांच्या हातात पडला.
नाशिक (गुलशनाबाद) हे तालुक्याचे ठिकाण असून संगमनेर जिल्ह्यात मोडत होते. महाराजांनी ठाणे जिल्ह्यातील जव्हारच्या मार्गाने पुढे सरकून नाशिक आणि बागलाणच्या मध्ये पसरलेल्या पूर्व–पश्चिम डोंगरावरील किल्ले हस्तगत करण्याचा सपाटा चालविला. इंद्राई, कांचन, मांचन, अचलगड, मार्कंडगड, अहिवंतगड हे किल्ले मराठ्यांच्या हातात पडले. शिवाजी महाराजांनी बागलाण आणि डांग वाटेने पुढे सुरतेवर हल्ला चढविला (३ ते ५ ऑक्टोबर १६७०). सुरतेतील समृध्द व्यापारी, पेढीवाले आणि सावकार यांची संपत्ती हरण करण्यात आली. या स्वारीत त्यांच्याबरोबर मकाजी आनंदराव, वेंकाजी दत्तो, प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे आदी होते. हिरे, मोती, सोने-नाणे अशी सु. पन्नास लाखाची लूट या स्वारीत मिळाली. लुटीची बातमी ऐकून औरंगजेबाला मोठा धक्का बसला. मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी दाऊदखान कुरेशी चांदवडला गेला. मोगलांचे मुख्य जिल्ह्याचे ठिकाण मुल्हेर हे होते. मराठे-मोगल यांत लढाई झाली (१७ ऑक्टोबर १६७०). या लढाईत मोगलांचे अनेक सैनिक व सरदार ठार अगर जखमी झाले. मराठ्यांनी सुरतेचा खजिना नाशिक-त्रिंबक-मार्गे सुरक्षितपणे स्वराज्यात आणला. कोकणात या सुमारास शिवाजी महाराजांनी राजगडहून राजधानी रायगडला हलविली (१६७०). पुढील अल्पकाळातच मराठ्यांनी त्र्यंबकेश्वर, खळा, जवळा, औंढा, पट्टा इ. किल्ले जिंकून घेतले. ५ जानेवारी १६७१ रोजी मराठ्यांनी बागलाणातील साल्हेरचा मजबूत किल्लाही जिंकून घेतला. लवकरच राज्याभिषेकाचा अपूर्व सोहळा रायगडावर संपन्न झाला. राज्याभिषेक वैदिक संस्कारांनीच संपन्न व्हावा, असे गागाभट्टादी विद्वानांनी ठरविले. ६ जून १६७४ ज्येष्ठ शुध्द द्वादशी, शुक्रवारी, शके १५७६, शिवाजी महाराजांनी राजसिंहासनावर बसून छत्रचामरे धारण केली. स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवरही समारंभ झाले. तोफांना सरबत्ती देण्यात आल्या. राज्याभिषेक समारंभानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा वऱ्हाड, खानदेश या मोगल इलाख्यात चढाया केल्या (१६७४-७५).
शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या काळात सोयराबाई व संभाजी यांचे पटत नाही, हे माहीत असल्यामुळे त्यांनी संभाजींना सहकुटुंब शृंगारपुरास राहण्यास बजाविले. संभाजींनी दिलेरखानाशी पत्रव्यवहार केला. शृंगारपूरला संभाजी असताना त्यांचे मंत्र्यांशी खटके उडत होते. म्हणून महाराजांनी संभाजींना कोकणातून हलवून परळी येथील सज्जनगड किल्ल्यावर जाण्यास सांगितले; पण स्वराज्यातून निघून मोगलांना मिळावयाचे हे संभाजींनी ठरविले होते. त्याप्रमाणे दिलेरखानाशी बोलणी करून ते १३ डिसेंबर १६७८ रोजीच परळी सोडून एकाएकी माहूलीला स्नानासाठी जातो म्हणून गेले आणि दिलेरखानाच्या छावणीत दाखल झाले. या सुमारास मराठ्यांनी चढाईचे धोरण स्वीकारून कोप्पळचा किल्ला जिंकून घेतला (३ मार्च १६७९). मसूदखान आणि दिलेरखान एक झाले, पण महाराजांची आक्रमणे त्यांना थांबविता येईनात. तेव्हा दिलेरखानाने संभाजींना पुढील महत्त्वाच्या मोहिमांत आपल्याबरोबर घेऊन प्रथम स्वराज्यातील भूपाळगडचा किल्ला जिंकून घेतला (१७ एप्रिल १६७९). त्यावेळी किल्ल्यातील सु. सातशे लोकांचे हात तोडण्यात आले. सज्जनगडावरून महाराज रायगडास परतले (४ फेब्रुवारी १६८०). रायगडावर राजारामांचे मौंजीबंधन झाले (७ मार्च १६८०). १५ मार्च १६८० रोजी राजारामांचा विवाह झाला. समारंभानंतर काही दिवसांनी महाराज आजारी पडले. नवज्वराचा ताप असावा. रक्ताच्या उलट्या होऊन महाराजांचा रायगडला मृत्यू झाला, असे फार्सी कागदपत्रांत म्हटले आहे. इंग्रज वखारींच्या कागदपत्रांत रक्ताचा अतिसार झाला असे लिहिले आहे. त्यांच्या मृत्यूविषयी विश्वासार्ह पुरावा अद्याप ज्ञात झाला नाही.
शिवाजी महाराज हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. ते अजिंक्य असे लढवय्या पुरुष होते.
लेखक =योगेश शुक्ल 9657701792

Spread the love