आरोधक विरोधकांनी कोळी लोकांच्या तोंडाला पानेच पुसलीत..

0
12

चोपडा – तालुका विधानसभा मतदारसंघ सन २००९ पासून अनु.जमातीसाठी राखीव असल्याने ह्या मतदार संघातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळणे दुरापास्त होते. हे दाखले सुलभपणे मिळावेत यासाठी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर यांनी जिवाची पर्वा न करता अन्नत्याग सत्याग्रहाच्या माध्यमातून शेकडों दाखले मिळवुन दिलेत. सामा. कार्यकर्ते असलेले जगन्नाथ बाविस्कर यांच्याकडे कोणतेच राजकीय किंवा लाभाचे पद नसताना सर्व समाज संघटना सोबत घेऊन हे काम करून दाखवले आहे. हेच काम जर सत्ताधारी किंवा विरोधकांनी केले असते तर कोळी लोकांना एवढी वर्षे भटकंती करावी लागली नसती. निवडणुका आल्यात की सर्वच समाजांना भुलथापा द्यायच्या. तद्नंतर पध्दतशीरपणे विसरून जायचे. असेच षडयंत्र सुरू आहे. म्हणूनच आतापर्यंत आरोधक (सत्ताधारी) व विरोधकांनी आदिवासी कोळी लोकांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत, अशी सडेतोड प्रतिक्रिया चोपडा तालुका महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर ( गोरगावले बु.) यांनी ह्या पत्रकान्वये व्यक्त केली आहे.

 अन्नत्याग सत्याग्रहाचे “ते” पाच दिवस….

समाजासाठी वाटेल ते करूं, जिंकू किंवा मरूं अशी भूमिका घेऊन अमळनेर प्रांत कार्यालयासमोर तीव्र अन्नत्याग सत्याग्रह केला. त्या काळात घर, ऑफिस, शेती, दुकान बंद ठेवून परिवारासह सर्वच समाज संघटना सोबत राहिल्या. गल्ली ते दिल्लीपर्यंत निवेदने पाठवलीत. परंतु ज्या पक्षासोबत आयुष्य काढले. तनमनधन लावून पक्ष वाढीसाठी काम केले. त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. किंवा उपोषणस्थळी भेटही दिली नाही. कालपरत्वे आमचा ८० टक्के कोळीसमाज आधी आघाडी सोबत होता. तद्नंतर युतीसोबत राहिला व आहे. विरोधक भेटायला आलेत परंतु सत्ताधारी घरी बसूनच होते. मग यांच्यासोबत काम का करावे ? असाही प्रश्न आहे. यापुढे आम्हाला समाजहितासाठी स्वतंत्र विचार करणे गरजेचे आहे.कारण समाजासाठी केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाचे “ते” पाच दिवस आम्हाला मरणयातना देऊन गेलेत..

Spread the love