अडावद (चोपडा) -: येथील मोकळ्या जागेत बांधकाम करण्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी व दगडफेक झाली. त्यात १४ जण जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. २१) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही गटांतील ९३ संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.
येथील मोकळ्या जागेत बांधकाम करण्यावरून दोन गटांत वाद झाला. त्यात दोन्ही गटांतील संशयित समोरासमोर आल्याने त्यांच्यात तुफान हाणामारीसह दगडफेक झाली. त्यात १४ जण जखमी झाले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत तनुजा लाला तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अडावद पोलिस ठाण्यात एका गटातील संशयितांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला.
या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत चार संशयितांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. दुसऱ्या गटातर्फे मोहसीन खान जबिउल्ला खान यांनी फिर्याद दिली. त्यावरून संशयितांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात आतापर्यंत सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
त्यांनाही न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या घटनेतील तीन मुख्य संशयितांसह इतरही संशयित फरारी आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पोलिसांकडून संशयितांचे अटकसत्र रात्री उशीरापर्यंत सुरू होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ तपास करीत आहेत.
पोलिस अधीक्षक घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक कविता नेरकर, चोपड्याचे उपअधीक्षक कुणाल सोनवणे, चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक कावेरी कमलाकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. अडावद येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले होते.