जळगाव – अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. होळीच्याच दिवशी घराला आग लागून गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घरातील कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू झाला.
दिलीप नामदेव पाटील असे मयताचे नाव आहे.
याबाबत असे की, अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथे कुटुंबासह वास्तव्यास असलेले दिलीप पाटील त्यांच्या पत्नी सायंकाळी दिवा लावत असतानाच घरात अचानक आग लागली आणि त्यातच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. घराचे लाकडी छत आणि घरात कापूस असल्याने सर्व घरातच आग पसरली. दिलीप यांच्या पत्नी, मुलगा आणि नात तातडीने घराबाहेर पळाले.
मात्र दिलीप यांना चक्कर आल्याने ते घरात अड कून पडले. ग्रामस्थ मिळेल त्या साधनांनी आग आटोक्यात आणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत त्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. घर आणि घरात असलेल्या किराणा दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. आगीत पाटील यांच्या पत्नी संगीता, मुलगा विकी व नात खुशी हे देखील जखमी झाले आहेत.