जळगाव – राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद उड्डाणपुलावर मागून भरधाव आलेल्या वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना रविवारी (ता.५) दुपारी घडली. माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
कुटूंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दीपक कडू सूर्यवंशी (वय ४५, रा. नशिराबाद) असे मृताचे नाव आहे. दीपक हे पत्नी व दोन मुलींसह नशिराबादला वास्तव्यास होते.
नशिराबाद गावातील पार्वती मेडीकलवर काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. रविवारी दीपक दुचाकीने भुसावळकडून नशिराबाद येथे येत असताना दुपारी दीडच्या सुमारास मागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दीपकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. दीपक यांना तपासणीअंती शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी जयश्री व दोन लहान मुली आहेत. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.












