आंध्र प्रदेशमधील श्री साथ्या साई जिल्ह्यात चिल्लाकोंडायपाल्ली गावात एका रिक्षावर विजेची तार पडली. हायव्हॉल्टेज तारेमुळे रिक्षाने लगेच पेट घेतला. या दुर्घटनेत रिक्षातील पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला. रिक्षा चालक मात्र सुदैवाने वाचला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व महिला शेतमजूर होत्या. त्या गुंडामपल्ली येथील चिलाकोंडायपल्ली येथील लिंबाच्या शेतात काम करायला जात होत्या. सकाळी साडे सातच्या सुमारास त्यांची रिक्षा धर्मावरम भागातून जात असताना रिक्षावर हायव्हॉल्टेज तार कोसळली. रिक्षाने तत्काळ पेट घेतला. या रिक्षातील पाचही मजूर महिलांचा होरपळून मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृत्युमुखी पडलेल्या महिलांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.