जळगाव – राज्यभरात गणेशोत्सवाचा आनंद शिगेला पोहचला आहे. अनेक ठिकाणी बाप्पाचे विसर्जनही सुरू आहे. मात्र, याचदरम्यान काही दुर्दैवी घटना घडल्याचेही समोर आले आहे.
अशीच एक घटना जळगाव तालुक्यातील कानळडा येथे विसर्जन मिरवणुकीत घडली. विसर्जन मिळवणुकीत नाचताना 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. जितेंद्र ज्ञानेश्वर बाविस्कर वय 19 असे मयत तरुणाचे नाव आहे.
हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता
कानळदा गावात सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने सात दिवसांच्या गणरायाची स्थापना करण्यात आली होती. काल (सोमवारी) सात दिवस पूर्ण झाल्यानंतर बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी बँडच्या तालावर वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नृत्य करत असताना जितेंद्र बाविस्कर हा तरुण अचानक जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
दरम्यान या घटनेने सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर साध्या पद्धतीने गणपतीचे विसर्जन करण्यात आलं. या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर नेमका मृत्यूचा खरं कारण समोर येणार आहे. शोकाकुल वातावरणात आज तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुणाच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आली.
बोईसरमध्ये युवकाचा बुडून मृत्यू
अडीच दिवसांच्या गणेश विसर्जनादरम्यान सूर्या नदीपात्रात उतरलेल्या आदिवासी युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चिल्हार बोईसर रस्त्यावरील गुंदले गावच्या हद्दीतील गरवाशेत भागातील सूर्या नदी पात्रात गुरुवारी सायंकाळी विसर्जन सुरू असताना ही घटना घडली आहे. साहिल दिनेश उंबरसाडा (वय 18) असे मृताचे नाव आहे. यावेळी मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असून त्याचा शोध सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान नदीपात्रालगतच्या गावांच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळून आल्यास पोलिस अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आवाहन बोईसर पोलिसांनी केले आहे.











