साकळी ता.यावल (वार्ताहर) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारांच्या याद्या अतिशय बारीक अक्षरात असल्याने त्या याद्या वाचतांना नागरिकांना खूप त्रास होत आहे. त्यांच्या डोळ्यांना ताण पडत आहे. या याद्या एवढ्या बारीक अक्षरात आहे की, चष्मा लावून सुद्धा वाचतांना नागरिकांना मोठी अडचण येत आहे. त्याचप्रमाणे या मतदार याद्या दि.१५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत प्रशासनाला प्राप्त झाल्याचे नागरिकांनी पाहिले मात्र या याद्या ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिध्दीसाठी कोठेही लावलेल्या नव्हत्या.त्यामुळे काही काळ संभ्रम निर्माण झालेला होता.असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी सदर प्रकारावरून निवडणुकीच्या महत्वाच्या कामकाजाबाबत संबंधित प्रशासन किती गांभीर्याने घेत आहे हे दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर असे की, साकळी ग्रामपंचायतीच्या येत्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अपडेट करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. साकळी ग्रामपंचायत प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या संयुक्तपणे मागील गेल्या काही दिवसांपूर्वी गावातील काही पदाधिकारी व नागरिकांना बोलवून मतदार याद्या वाचन करण्यात आले.त्यानुसार या मतदार याद्या दुरुस्तीसाठी वरिष्ठ प्रशासनाकडे पाठवण्यात आल्या.त्यानंतर दि.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नवीन तयार झालेल्या याद्या ग्रामपंचायत प्रशासनाला प्राप्त झाल्या.त्यानंतर सदरील याद्या नागरिकांना वाचनासाठी सूचना फलकावर लावणे अपेक्षित होते मात्र तसे न होता त्या याद्या ग्रामपंचायतीत कुठेही लावलेल्या दिसून आल्या नाही.त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम झालेला दिसून आला.
गावातील नागरिक विलास पवार यांनी सदर याद्या वाचण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडे मागितल्या असता, त्यांना त्या याद्या देण्यात आल्या.
या याद्यांमधील छपाई केलेले अक्षर एवढे बारीक आहे की त्या वाचतांना डोळ्यांना त्रास होत आहे.चष्मा लावून सुद्धा वाचतांना अवघड होत आहे. तसेच त्या यादया मधील अक्षरे पुसट व असष्ट आहे .असे नागरिकांचे म्हणणे आहे.निवडणुकांचे काम प्रशासनाकडून अतिशय काळजीपूर्वक व गांभीर्याने करणे गरजेचे आहे. तथापि साकळी पंचायतीच्या निवडणुकीच्या कामकाजात प्रशासनाकडून गांभीर्य पूर्वक घेतले जात नाही असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.तरी संबंधित निवडणूक प्रशासनाकडून सदरील मतदार यादी ठळक अक्षरात,नागरिकांना वाचता येतील अशा स्वरूपात प्रसिध्द करण्यात याव्या अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.