जगात राजसत्ता , धर्मसत्ता उदयास आल्या मात्र या दोघं सत्तांनी महिलांवर अनन्वित अन्याय , अत्याचारच केलेले आहेत . धर्माने अनेक कायदे तयार करून महिलांना बंदिस्त केले . महिलेच्या उदरातून जन्माला आलेल्या धर्मगुरूनेच तिला पापी संबोधले , नरक म्हटले तिच्यावर क्रूर प्रथा लादल्या , अनेक महिलांना उपभोगण्याचे साधन मानून त्यांच्या शरीराचे राजरोस , बिनदिक्कत लचके तोडले . महिलांनी हे सारे धार्मिक अन्याय , अत्याचार सहन केले .
जगात अनेक प्रकारची राजकीय सत्ता अस्तित्वात होती मात्र कोणत्याच सत्तेने महिलांना साधा मतदानाचा अधिकार दिला नव्हता तेंव्हा आम्हाला मतदानाचा अधिकार द्या म्हणून सन १८९० मध्ये अमेरिकेत महिलांनी स्वतंत्र चळवळ सुरू केली . या महिला ‘ महिलांना मतदानाचा अधिकार ‘ एकीकडे मागत होत्या तर दुसरीकडं धार्मिक गुलामगिरीतून हा ‘ मतदानाचा अधिकार फक्त गोऱ्या महिलांना द्यावा , अन्य महिलांना तो अधिकार देण्यात येऊ नये ‘ म्हणूनही लढत होत्या त्याचा परिणाम असा झाला की कृष्ण वर्णीय लोक या चळवळीच्या विरोधात उतरले . यामुळे ही चळवळ पुढं बंद झाली .
१८९० नंतर ८ मार्च १९०८ ला अमेरिकेतील विविध क्षेत्रातील महिला कामगार आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र आल्या . कामाचे तास १० तास असावे , महिला कामगारांना सुरक्षितता असावी , वेतन वाढवून मिळावे , रात्रपाळीतून महिला कामगारांना वगळण्यात यावे या व अन्य काही मागण्या घेऊन त्यांनी मोठे आंदोलन केले . २८ फेब्रुवारी १९०९ ला न्यू यॉर्क शहरात ‘ सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका ‘ या संघटनेने महिलांची एक स्वतंत्र परिषद घेतली . या परिषदेत महिला मोठ्या संख्येने प्रथमच एकत्र आल्या होत्या , महिलांची भाषणं अत्यंत प्रभावी झाली . ही परिषद मोठयाप्रमाणात यशस्वी झाल्याने हा दिवस जगातील पहिला महिलादिन म्हणून ओळखला जातो . २८ फेब्रुवारी हा दिवस १९१३ पर्यंत जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला गेला .
१९१० मध्ये कोपनहेगन येथे ‘ आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद ‘ घेण्यात आली . या परिषदेत १७ देशांतून महिला आलेल्या होत्या . जर्मनीच्या क्लारा झटेफिन या महिलेने आतंरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना मांडली . या परिषदेत ८ मार्च १९०८ मध्ये करण्यात असलेल्या महिला आंदोलनाची आढवण कायम राहावी म्हणून ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून मान्य करावा असा ठराव संमत करण्यात आला . १९ मार्च १९११ या दिवशी डेन्मार्क , ऑस्ट्रिया , जर्मनी , स्वित्झर्लंड या देशांनी आतंरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला .
१९ मार्च १९११ ला महिलांना नोकरी करण्याचा , मतदान करण्याचा , प्रशिक्षित होण्याचा , सार्वजनिक पदांवर काम करण्याचा अधिकार मिळाला . अजूनही काही अधिकार त्यांना मिळाल्याने महिला रस्त्यावर येऊन आनंद साजरा करत असतानाच २५ मार्च १९११ रोजी न्यू यॉर्क येथील एका कंपनीत मोठी दुर्घटना घडली व त्यात १४० माहिलांना आपल्या प्राणास मुकावे लागले . या दुर्घटनेत बळी गेलेल्या महिलांना पुरेसा न्याय न मिळाल्याने चळवळ काहीशी थंडावली . १९१७ मध्ये रशियात राज्यक्रांती यशस्वी होऊन साम्यवादी विचाराचे सरकार आले . या सरकारने ८ मार्च १९१८ ला महिला दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करून या दिवसाला मान्यता दिली . याच वर्षी इंग्लंड ने तर १९१९ ला अमेरिकेने ८ मार्च हा दिवस महिला दिवस म्हणून मान्य केले .
भारतात मुंबई शहरात ८ मार्च १९४३ ला हा दिवस साजरा केला गेला . ८ मार्च १९७१ ला पुणे शहरात या दिवसानिमित्त प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला . या मोर्चात पुरुष सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . १९७५ ला संयुक्त राष्ट्रांनी प्रथमच आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला १९७७ ला संयुक्त राष्ट्र संघाने त्यांच्या आम सभेत एका ठरावाने त्यास मान्यता दिली व तिथून हा दिवस बहुतांश देशांमध्ये दरवर्षी साजरा केला जाऊ लागला .
या दिवसापासून महिलांच्या प्रश्नांवर जागतिक पातळीवर काम होऊ लागले . विविध क्षेत्रात त्या उत्कृष्ट कामगिरी करू लागल्या . विविध देशांच्या राष्ट्रपती , प्रधानमंत्री , गव्हर्नर , विरोधी पक्षनेत्या सारख्या अतिउच्च पदांवर त्या त्या देशाच्या संविधानाने दिलेल्या संवैधानिक अधिकारांच्या आधारे पोहचल्या . असे असले तरी धार्मिक ग्रंथाच्या आधारे राजकीय सत्ता चालविणाऱ्या अनेक देशात महिलांचे जगणे म्हणजे धार्मिक भाषेत नरक यातना भोगणे आहे . त्या मतदान करू लागल्या मात्र राजकीय क्षेत्रात त्या दुय्यम राहिल्या .
एपस्टीन च्या माध्यमातून अतिउच्च पदावरील पुरुषांना अल्पवयीन मुली पुरविण्याचे काम बिनदिक्कत चालू होते , त्यातून हजारो मुलींचे आयुष्य लहानपणातच बरबाद झाल्याचे उघड झाले आहे . वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याची मागणी खुद्द एक महिला करत आहे . बेपत्ता होणाऱ्या मुलींची , महिलांची संख्या दरवर्षी वाढत आहे , पाच – पाच वर्षे उलटूनही बेपत्ता महिलांचा ठावठिकाणा लागत नाही याचा कोणी गांभीर्याने विचार करत नाही . काही देशांमध्ये आजही महिलांना सेक्स गुलाम म्हणून वागविण्या करिता स्वतंत्र छावणी तयार केलेली आहे .
आज विज्ञान युगात महिलांना अनेक सोई सवलती मिळत आहेत . शिक्षणात त्यांनी मोठी क्रांती केली आहे . असे असले तरी स्वतः महिला आजही तिच्या हक्क व अधिकारा विषयी एवढी जागृत तसेच गंभीर नाही . अलीकडेच दोन न्यायालयीन खटल्यांमध्ये खुद्द न्यायाधीशांनी महिलांविषयी गलिश्च निर्णय दिले . त्या विरोधात एकाही महिलेने साधा निषेध नोंदविला नाही . आजही स्त्री प्रचंड अंधश्रद्धाळू आहे . तिची मानसिक गुलामगिरी ती अधिक वाढवीत आहे . समाजात बलात्कार , कौटुंबिक हिंसाचार , स्त्री भ्रूणहत्या , हुंडाबळी वाढत आहे मात्र स्त्री निमूटपणे सहन करीत आहे . तिचे नौकरीचे प्रमाण घटत आहे , शैक्षणिक सोई सुविधा कमी केल्या जात आहेत तरीही ती संघर्ष करीत नाही . असे जरी असले तरी बलात्कारी बाबाच्या समर्थनार्थ ती रस्त्यावर येते , त्याची पूजा अर्चा करते .
भारतीय स्त्रियांच्या उध्दारास जे महापुरुष लढले त्या महापुरुषांची कित्येकांना नावं सुद्धा माहीत नसतील , त्यांची जेंव्हा विटंबना होते तेंव्हा स्त्री एक शब्द बोलत नाही , ज्या संविधानाने महिलांना एवढे अधिकार दिले , मान सन्मान दिला त्या संविधानाला जेंव्हा काही माथेफिरू जाळून टाकतात , संविधानाची अवहेलना करतात तेंव्हा स्त्रिया संविधानाच्या बाजूने रस्त्याची लढाई लढत नाही . भारतात हीच परिस्थिती चालत राहिली तर जागतिक महिला दिवस फक्त एक सण म्हणून साजरा केला जाईल व समस्त स्त्री एक गुलाम म्हणून जगत राहील .
जयसिंग वाघ…..अजिंठा हाउसिंग सोसायटी , अजिंठा चौक जळगाव संपर्क …..९८८१९२८८८१










