बाबा रामदेव पडले तीन वर्षाच्या मुलीच्या पाया! पाहा काय आहे कारण

0
52

योगगुरू बाबा रामदेव यांची योग शिबिरं विविध कारणांनी अनेकदा गाजतात. आज चर्चा आहे ती त्यांच्या शिबिरातील एका व्हायरल व्हिडीओची. या व्हायरल व्हिडीओत बाबा रामदेव एका लहान मुलीच्या पाया पडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची पूर्ण लिंक यूट्यूबवर मिळाली असून आणि बाबा रामदेव या मुलीच्या पाया का पडले ते स्पष्ट झालं.

या व्हिडीओत बाबा रामदेव योग शिबिर घेत असताना जवळच असलेल्या एका लहान मुलीच्या खोकण्याचा आवाज ऐकून तिला जवळ बोलवतात. तिला एक औषध पाजताना दिसतात. त्यानंतर ती चिमुकली मुलगी संस्कृतमध्ये बोलत असल्याचं त्यांना लक्षात येतं. ‘नमो नम:’ असं म्हणणाऱ्या मुलीचं ते कौतुक करतात आणि तिला नमस्कार कसा करायचा असतो हे माहित आहे का ते विचारताना दिसतात. यानंतर ते स्वत: त्या मुलीच्या पाया पडतात. हाच तो त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्या देशात इंग्रजीचं इतकं महत्त्व वाढलेलं असतानाही आता लोक आपल्या मुलामुलींना संस्कृत शिकवत असल्याचं पाहायला मिळत असल्याचं कौतुकही त्यांनी यावेळी केलं.

पुण्यातील एका यज्ञ-योग शिबिरातील हा व्हिडीओ आहे. या चिमुकलीचं नाव योगज्ञा सचिन पाटील असून ती अवघ्या तीन वर्षांची आहे. तिला लहानपणापासून संस्कृतचं आणि योगाचं शिक्षण मिळावं अशी तिच्या वडिलांची इच्छा आहे. त्यांनी स्वत: संस्कृतचं शिक्षण घेतलं असून घरात मातृभाषा मराठी सोबत संस्कृत बोलण्यावर त्यांचा जोर असल्याचं त्यांनी सांगितलं. सचिन पाटील हे स्वत: योगशिक्षक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Spread the love