बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय विकृत पद्धतीने हत्या करण्यात आली.
त्यावरून बीडमध्ये मोठ्या घडामोडी घडत असून राज्यातील वातावरण तापलं आहे. या प्रकरणात सामिल असल्याचा आरोप वाल्मिक कराड यांच्यावर होत आहे आणि ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे मुंडेही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
जळगाव जिल्ह्ह्यातील झुरखेडा येथे धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. महाराष्ट्र सर्वात आवडतं राज्य आहे. भारतातील हिंदू आणि युवा वर्ग जागृत होत आहे. देश एका नव्या क्रातींच्या दिशेने प्रवास करत असल्याचं ते म्हणाले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. बीड हत्या प्रकरणावरून धीरेंद्र शास्त्रींना विचारलं असता, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे कमी व्हावेत आणि या प्रकरणातील गुन्हेगाराना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या परिवाराचे सदस्य असून ते हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहेत. जो सनातनच काम करेल, तोच या देशावर राज्य करेल. कोणत्याही परिस्थितीत देशातील हिंदू लोकांचं काही वाईट होवू नये एवढीच अपेक्षा आहे. जळगाव जिल्ह्यातील लोकांचे जे प्रेम मिळाले, या ठिकाणचा बैलगाडीवरचा प्रवास, हा माझ्या आयुष्यातीला सर्वात अविस्मरणीय क्षण होता. छोट्या-छोट्या मुलांच्या कपाळावर छत्रपती शिवाजी महाराजांचे टिळा पाहून असं वाटले की, छोट्या छोट्या मुलांचे रूपाने वीर छत्रपती शिवाजी महाराज… हिंदवी स्वराज्याचा स्थापनेसाठी पुन्हा आले आहेत, असेही शास्त्री म्हणाले.