शहरात एकाचवेळी 15 ठिकाणी 15’टीम’द्वारे रस्त्यांची कामे; 100 कोटींच्या कामांचे कार्यादेश

0
44

जळगाव – शंभर कोटींच्या निधीतून शहरात रस्त्यांची कामे सुरू होत असून वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, कामे रखडू नये म्हणून १५ ‘टीम’च्या माध्यमातून विविध १५ ठिकाणी एकाचवेळी कामे सुरू करण्यात येतील.

त्यामुळे ती वेळेत पूर्ण होऊन वाहतूक प्रभावित होणार नाही, असे नियोजन मंगळवारी (ता. ३१) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आले. ही कामे करताना महापालिका, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलीस व महावितरण या विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी केली.

जळगाव शहरातील नवीन रस्त्यांच्या कामांचा व शहर वाहतूक नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, महापालिका शहर अभियंता सी. एस. सोनगीरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता जयंत चोपडे, उपअभियंता संजय राठोड, आर. एम. पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार आदी उपस्थित होते.

गौण खनिज वापराबाबत

शहरातील रस्ते तसेच इतर कामे करणाऱ्या ठेकेदारांनी अधिकृत रॉयल्टी भरणा केलेल्या गौण खनिजांचा वापर करावा. त्यांच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आल्याची खात्री करण्यात यावी, अशा सूचना श्री.महाजन यांनी दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील सूचना

० सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची यादी तयार करावी

० कामे सुरू असलेल्या ठिकाणांची यादी वाहतूक शाखेला द्यावी

० एकाच वेळेस सर्व रस्ते बंद न करता, ‘क्रॉसिंग’च्या ठिकाणी लक्ष देण्यात यावे

० अमृत योजनेतील कामे निवडणुकीपूर्वी पूर्ण होतील याची काळजी महापालिकेने घ्यावी

० जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद पडणार नाही, यासाठी चारही फायबर ऑप्टिकल कंपन्यांना प्रस्तावित खोदकाम करण्यात येणाऱ्या रस्त्यांची यादी द्यावी

० महावितरणकडून पोल स्थलांतराचे काम वेळेत करण्यात यावे

फेब्रुवारीपर्यंत कामे करावीत

सरकारने जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी १०० कोटींचा निधी दिला आहे. त्या निधीतून शहरात लहान-मोठी अशी २६३ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासंबंधी कार्यादेश देण्यात आले असून कामे तातडीने सुरू करून वेळेत संपवावी, असे निर्देश ठेकेदार एजन्सीला देण्यात आले आहेत. फेब्रुवारीनंतर तापमान वाढत असल्याने कॉंक्रिटीकरणाच्या कामात समस्या निर्माण होतात. म्हणून फेब्रुवारी २०२४ अखेर ही कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

Spread the love