जळगाव -: जिल्ह्यात गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नसून जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे गुन्हा घडताना दिसत आहे. अशातच यावल तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आलीय.
विरावली-दहिगाव रस्त्यावर रात्री एका २१ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली.
विशेष म्हणजे खून केल्यानंतर दोन संशयित स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाले. इम्रान युनूस पटेल (२१, रा. सुरेश आबा नगर, दहिगाव, ता. यावल) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून केल्यानंतर दोन संशयित तरुण दुचाकीने यावल पोलिस ठाण्यात आले आणि त्यांनी खुनाची माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळाल्यावर यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे कर्मचाऱ्यांसह तातडीने विरावली रोडवरील घटनास्थळी पोहोचले. तेथे इम्रान याचा मृतदेह आढळून आला. या खुनामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. रात्री उशिरापर्यंत यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) व गजानन रविद्र कोळी (वय १९) असं हत्या करणाऱ्या दोघे संशयिताचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.