जळगाव – (प्रतिनिधी )मोबाईलवर गेम खेळायचे आमिष देवून पाचोरा शहरातील एका सात वर्षीय चिमुकलीवर तरुणाने अत्याचार केल्याची घटना 2018 मध्ये घडली होती. या गुन्ह्यातील संशयित भैय्या भरत गायकवाड वय 22 यास जिल्हा न्यायालयाने 10 वर्ष सश्रम कारावास व 35 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्या. श्री. एस.एन.माने यांच्या न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला.
या घटनेची माहिती अशी की, 7 मार्च 2018 रोजी दुपारी साडे बारा वाजता भैय्या गायकवाड याने मोबाईल खेळण्याच्या बहाण्याने पीडित बालिकेला घरात बोलावले घेत अत्याचार केला होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर गायकवाड याच्याविरुध्द बलात्कार, बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. तपासाधिकारी दत्तात्रय नलावडे यांनी तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपत्र पाठविले होते. जिल्हा सत्र न्यायाधीश एस.एन.माने (गाडेकर) यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात सरकारपक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. यात बालिका, पीडितेची आई, तपासी अमलदार व डॉक्टर यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. सरकारकडून जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली.
पीडित बालिकेची साक्ष ठरली महत्वपूर्ण
पिडीत अल्पवयीन मुलीने न्यायालयासमोर संपूर्ण घटना जशीच्या तशी सांगितली होती. तिची साक्ष तसेच न्यायालयासमोर आलेले पुरावे, सरकार पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने भैय्या गायकवाड याला दोषी धरुन बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराच्या कलमात 10 वर्ष सश्रम कारावास, 25 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास, कलम 354 अ अन्वये दोन वर्ष सक्त मजुरी व 5 हजार रुपये दंड, 354 ब अन्वये 3 वर्ष सक्त मजुरी व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी गोरखनाथ गायकवाड यांनी सहकार्य केले.