एरंडोलजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक; फार्मसी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, सीआरपीएफ जवान गंभीर

0
11

समर्थ बैठक हॉलजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींवरील अन्य तरुणही जखमी

एरंडोल – : जळगाव संदेश प्रतिनिधीराष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावर समर्थ बैठक हॉलजवळ शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय जयेश अनिल पाटील याचा जागीच मृत्यू झाला, तर सीआरपीएफ जवान सचिन नाना पाटील (वय २५) हे गंभीर जखमी झाले. अपघातात दोन्ही दुचाकींवरील अन्य तरुणांनाही दुखापत झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्री फार्मसी महाविद्यालयात बी. फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा जयेश अनिल पाटील हा शुक्रवारी पेपर सुटल्यानंतर मित्र निखिल दिनेश पवार आणि सुधाकर कुंभार यांच्यासह दुचाकीने (एमएच १९ ईएच ६३७९) एरंडोलच्या दिशेने येत होता. त्याचवेळी सीआरपीएफ जवान सचिन नाना पाटील हे कुणाल जिजाबराव पाटील (वय २१) आणि दिगंबर तुकाराम पाटील (वय २०) यांच्यासह दुचाकीने (एमएच १९ सीएम २९२२) आपल्या तुराटखेडे गावाकडे जात होते.

समर्थ बैठक हॉलजवळ दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली. या अपघातात जयेश पाटील याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सीआरपीएफ जवान सचिन पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले.

वर्षभरापूर्वीच हरपले होते पितृछत्र

मृत जयेश पाटील हा पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे आपल्या मामाकडे राहून शिक्षण घेत होता. अवघ्या वर्षभरापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या मामानेच त्याचा सांभाळ करून शिक्षणाचा खर्च उचलला होता. अभ्यासात हुशार असलेल्या जयेशच्या अकाली निधनाने तामसवाडी गावासह महाविद्यालयीन परिसरात शोककळा पसरली असून, त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या भीषण अपघातामुळे परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Spread the love